राज्यात २९ ते ३१ जुलैदरम्यान विविध भागांत मध्यम ते मुसळधार पावसाचा अंदाज

मुंबई, दि. २८ : बंगालच्या उपसागराकडून येणाऱ्या कमी दाबाच्या पट्ट्याच्या प्रभावामुळे राज्यातील विविध भागांत २९ ते ३१ जुलैदरम्यान पावसाचा जोर वाढण्याचा अंदाज आहे. या कालावधीत विदर्भ, उत्तर मराठवाडा, खानदेश, कोकण तसेच मध्य महाराष्ट्रातील घाट परिसरात मध्यम ते मुसळधार पावसाची शक्यता आहे. तसेच विदर्भ, उत्तर मराठवाडा आणि खानदेशमध्ये वाऱ्याचा वेग वाढण्याचाही अंदाज आहे. तुलनेने मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्राच्या दक्षिण भागात कमी पावसाची शक्यता आहे.

या काळात अतिवृष्टीसदृश पावसाच्या घटना घडू शकतात. त्यामुळे सखल भागांत पाणी साचणे, नदी-नाल्यांना पूर येणे, काही प्रमाणात संरचनात्मक नुकसान होणे, वाहतुकीवर परिणाम होणे तसेच काही ठिकाणी जनजीवन विस्कळीत होण्याची शक्यता आहे. मध्य महाराष्ट्रातील घाट परिसरात काही ठिकाणी दरड कोसळण्याचाही धोका आहे.

सध्याच्या हवामान अंदाजानुसार, २९ जुलै रोजी कमी दाबाच्या पट्ट्याचा प्रभाव प्रामुख्याने विदर्भात, विशेषतः पूर्व विदर्भात जाणवण्याची शक्यता आहे. ३० जुलै रोजी त्याचा प्रभाव पश्चिम विदर्भ, खानदेश, उत्तर मराठवाडा, मध्य महाराष्ट्रातील घाट परिसर आणि कोकणात अधिक जाणवू शकतो. ३१ जुलै रोजी खानदेशातील काही भाग तसेच मध्य महाराष्ट्रातील घाट परिसरात पावसाचा प्रभाव कायम राहण्याची शक्यता आहे.

मुंबई आणि मुंबई महानगर प्रदेशात ३० आणि ३१ जुलैदरम्यान पावसाचा जोर वाढण्याची शक्यता आहे. विशेषतः रायगड, ठाणे आणि पालघर जिल्ह्यांत ३० जुलै रोजी पावसाची तीव्रता अधिक राहण्याचा अंदाज आहे.

विदर्भ, उत्तर मराठवाडा, खानदेश आणि मध्य महाराष्ट्रातील घाट परिसरातील नागरिकांनी या कालावधीत सतर्क राहावे. विशेषतः सखल भाग, नदी-नाल्यांच्या परिसरात तसेच घाट रस्त्यांवरून प्रवास करताना अधिक काळजी घ्यावी. आपत्कालीन परिस्थितीत नागरिकांनी स्थानिक प्रशासनाशी संपर्क साधावा. राज्याच्या आपत्ती व्यवस्थापन विभागाकडून नागरिकांना आवश्यक ती खबरदारी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

००००

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *