मिरा-भाईंदर फाऊंटन ते गायमुख घोडबंदर रस्ता दुरुस्तीच्या कामांना गती द्या – मंत्री प्रताप सरनाईक

मुंबई, दि. २८ : मिरा-भाईंदर महानगरपालिका हद्दीतील फाऊंटन ते गायमुख या घोडबंदर मार्गावरील रस्त्याच्या दुरुस्तीची कामे तातडीने आणि दर्जेदार पद्धतीने पूर्ण करण्याचे निर्देश परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिले. यासंदर्भात मंत्रालयात त्यांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली.

“घोडबंदर रस्ता हा मिरा-भाईंदर परिसरातील नागरिकांसह मुंबई-ठाण्याकडे ये-जा करणाऱ्या हजारो वाहनचालकांच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा आहे. संबंधित सर्व यंत्रणांनी आपापली जबाबदारी निश्चित करून समन्वयाने दुरुस्तीची कामे करावीत आणि नागरिकांना लवकरात लवकर दिलासा द्यावा,” असे निर्देश परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिले.

या बैठकीला मिरा-भाईंदर महानगरपालिकेच्या आयुक्त राधा बिनोद शर्मा, नगरविकास विभागाचे उपसचिव, शहर अभियंता, सहाय्यक संचालक (नगररचना) तसेच संबंधित विभागांचे अधिकारी उपस्थित होते. रस्त्याच्या दुरुस्तीची सद्यस्थिती, प्रलंबित कामे, संबंधित यंत्रणांची जबाबदारी तसेच कामे पूर्ण करण्यासाठी निश्चित करण्यात आलेली कालमर्यादा याबाबत यावेळी सविस्तर आढावा घेण्यात आला.

“नागरिकांना सुरक्षित, खड्डेमुक्त आणि सुरळीत रस्ता उपलब्ध करून देणे ही महापालिका प्रशासनाची जबाबदारी आहे. विविध विभागांमधील समन्वयाअभावी कोणतेही काम रखडता कामा नये. घोडबंदर रस्त्याच्या दुरुस्तीचा प्रश्न प्राधान्याने मार्गी लावून नागरिकांची वाहतूक कोंडीतून सुटका करण्यासाठी आवश्यक निर्णय तातडीने घेतले जातील,” असे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी स्पष्ट केले.

००००

संजय ओरके/विसंअ

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *