राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांची ज्येष्ठ खगोलशास्त्रज्ञ डॉ. जयंत नारळीकर यांना भावपूर्ण श्रद्धांजली

पुणे, दि. २०: पद्मविभूषण डॉ. जयंत नारळीकर यांच्या निधनाने महाराष्ट्र आणि संपूर्ण देशाच्या विज्ञानविश्वाची हानी झाली आहे. ते केवळ एक महान खगोलशास्त्रज्ञ नव्हते, तर विज्ञानाच्या लोकाभिमुखतेचे जनकही होते, अशा शब्दांत महिला व बालविकास राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांनी ज्येष्ठ वैज्ञानिक पद्मविभूषण, महाराष्ट्र भूषण डॉ. जयंत नारळीकर यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त केला आहे.

राज्यमंत्री मिसाळ शोक संदेशात म्हणतात की, ज्ञान, प्रज्ञा, सुलभता आणि साधेपणा यांचा संगम असलेल्या डॉ. नारळीकर यांनी विज्ञान जनसामान्यांपर्यंत पोहोचवले. त्यांनी अंधश्रद्धेवर प्रहार करत विज्ञानवादी विचार समाजात रुजविले. त्यांनी केंब्रिजमधून घेतलेले शिक्षण, टाटा मूलभूत संशोधन संस्थेतील योगदान, आयुका (IUCAA) ची स्थापना आणि मराठीतून विज्ञानलेखन हे सर्वच भारतीय विज्ञानविश्वासाठी दीपस्तंभ ठरले. आज आपण एका ज्ञानवृक्षाला मुकलो आहोत. त्यांचे जाणे ही केवळ वैज्ञानिक समुदायासाठीच नव्हे, तर प्रत्येक जिज्ञासू मनासाठी मोठी पोकळी निर्माण करणारी आहे. ही पोकळी भरून निघणे अशक्य आहे.

राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांनी डॉ. नारळीकर यांच्या कार्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करत त्यांच्या परिवाराप्रती संवेदना व्यक्त केल्या आहेत.

०००

श्रद्धा मेश्राम/विसंअ/

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *