राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांची समाजसेवेची भूमिका आजही प्रेरणादायी – पालकमंत्री संजय राठोड

यवतमाळ, दि.30 : राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांची समाजसेवेची भूमिका आजही प्रेरणादायी आहे. त्यांचे जीवनचरित्र आजच्या युवा पिढीने वाचले पाहिजे. राजर्षी छत्रपती शाहू महाराज ज्यांना कळले त्यांना महाराष्ट्र नक्की कळेल, असे प्रतिपादन पालकमंत्री संजय राठोड यांनी आज केले.

राजर्षी शाहू महाराज यांच्या जयंतीनिमित्त सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाच्या वतीने जिल्हा परिषदेच्या वसंतराव नाईक सभागृहात आयोजित सामाजिक न्याय दिन समारंभ आणि नशामुक्त सप्ताहाच्या समारोपीय कार्यक्रमात ते बोलत होते. या कार्यक्रमाला उप मुख्य कार्यकारी अधिकारी संतोष धोत्रे, युवराज मेहेत्रे, जालिंदर आभाळे, समाज कल्याण सहायक आयुक्त मंगला मुन, शिक्षणाधिकारी किशोर पागोरे, माजी जिप सदस्य यशवंत पवार, श्रीधर मोहोड, हरिहर लिंगमवार आदी मान्यवर व्यासपीठावर उपस्थित होते.

पालकमंत्री संजय राठोड यांनी राजर्षी शाहू महाराजांना अभिवादन करुन पुढे म्हणाले, राजर्षी छत्रपती शाहू महाराज हे खऱ्या अर्थाने प्रजेचे राजे होते. त्यांनी कायम प्रजा हितासाठी राज्यकारभार चालविला. सामाजिक न्याय आणि आरक्षणाचे खरे जनक होते. त्यांनी मागासवर्गीयांना शासकीय नोकरीत आरक्षण देण्याचा ऐतिहासिक निर्णय घेतला. शिक्षणाचा प्रसार आणि बहुजन समाजाचे सक्षमीकरण केले. तसेच अस्पृश्यता निर्मूलन, महिलांचा सन्मान, शेतकरी आणि दुर्बलांच्या आर्थिक उन्नतीसाठी कल्याणकारी उपाययोजना केल्या. यासोबतच डॉ बाबासाहेब आंबेडकर यांना कायम मदत केली,असे ते म्हणाले.

            छत्रपती शाहू महाराजांची समाजसेवेची भूमिका आजही प्रेरणादायी आहे. शैक्षणिक संस्था, शाळा, वसतिगृहे, शिष्यवृत्ती योजना सुरु त्या आजही सुरु आहेत. आम्ही शाहू-फुले-आंबेडकर यांच्या विचारानुसारच काम करत आहोत. त्यांचा वारसा जपणे हीच खरी आदरांजली ठरेल. राजर्षी छत्रपती शाहू महाराजांचे जीवनचरित्र आजच्या युवा पिढीने वाचले पाहिजे. ज्यांना छत्रपती शाहू महाराज कळले त्यांना महाराष्ट्र नक्की कळेल, असे मत पालकमंत्री संजय राठोड यांनी यावेळी व्यक्त केले.

            यावेळी उपमुख्य कार्यकारी अधिकारी संतोष धोत्रे यांनी राजर्षी शाहू महाराजांच्या जीवनकार्याबाबत माहिती विषद केली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक सहायक आयुक्त मंगला मुन यांनी तर आभार प्रदर्शन योगेश मेहेत्रे यांनी केले.

पालकमंत्र्यांच्या हस्ते गुणवंत विद्यार्थ्यांना राजर्षी शाहू महाराज गुणवत्ता पुरस्कार प्रदान

            समाज कल्याण विभागांतर्गत शाळांमधील यश संपादन करणाऱ्या अनुसूचित जमाती प्रवर्गातील गुणवंत विद्यार्थ्यांना राजर्षी शाहू महाराज गुणवत्ता पुरस्कार वितरित करण्यात आले. तसेच स्वाधार योजनेतील लाभार्थी, तंटामुक्तीसाठी उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्तींचा पालकमंत्री संजय राठोड यांच्या हस्ते प्रमाणपत्र व स्मृतिचिन्ह देवून सत्कार करण्यात आला.

            या कार्यक्रमात सामाजिक न्याय दिन साजरा मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. तत्पूर्वी आंतरराष्ट्रीय नशा मुक्ती व अवैध मादक पदार्थ तस्करी विरोधी दिनानिमित्त समाज कल्याण व मेरा युवा भारत कार्यालयामार्फत शहरात जनजागृती बाईक रॅली काढण्यात आली. तसेच मुख्य कार्यक्रमात उपस्थितांना नशामुक्तीची शपथ देण्यात आली. यावेळी विद्यार्थी, पालक, अधिकारी व कर्मचारी मोठ्यासंख्येने उपस्थित होते.

000000

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *