‘मुंबई स्टॉक एक्सचेंज’समोर स्वर्गीय बाबूजींचा पुतळा हा त्यांच्या कार्याचा गौरव – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

मुंबई, दि. 2: ‘मुंबई स्टॉक एक्सचेंज’ देशभरासाठी आकर्षणाचे ठिकाण आहे. अशा ठिकाणी स्वर्गीय बाबूजींचा पुतळा असणे, हा त्यांच्या कार्याचा गौरव असल्याचे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज केले.

मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते मुंबई स्टॉक एक्सचेंज समोर स्वातंत्र्य सेनानी स्वर्गीय जवाहरलाल दर्डा यांच्या अर्धाकृती पुतळ्याचे अनावरण करण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते. विधानसभा अध्यक्ष ॲड. राहुल नार्वेकर, उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार, कौशल्य विकास मंत्री मंगल प्रभात लोढा, जलसंपदा मंत्री गिरीश महाजन, सांस्कृतिक कार्यमंत्री ॲड. आशिष शेलार, मृदा व जलसंधारण मंत्री संजय राठोड, माजी खासदार विजय दर्डा, माजी मंत्री राजेंद्र दर्डा आदी यावेळी उपस्थित होते. मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, स्वातंत्र्यसेनानी स्वर्गीय जवाहरलाल दर्डा उपाख्य बाबूजी यांचे देशाच्या स्वातंत्र्य संग्रामातील कार्य खूप मोठे आहे. त्यांनी त्या काळात युवकांचे संघटन करीत आंदोलने करून स्वातंत्र्याची ज्योत तेवत ठेवली.

महाराष्ट्रात मंत्री असताना विविध खात्यांची जबाबदारी स्वर्गीय जवाहरलाल दर्डा यांनी यशस्वीपणे सांभाळली असल्याचे सांगत मुख्यमंत्री म्हणाले की, बाबूजींनी आपल्या सामाजिक राजकीय जीवनामध्ये दीर्घकाळ महाराष्ट्राचे मंत्री म्हणून केलेल्या कार्याची छाप संबंधित विभागामध्ये आजही जाणवते. यवतमाळमध्ये शालेय जीवनापासूनच त्यांनी स्वातंत्र्याच्या चळवळीत पुढाकार घेतला. त्या काळात असलेल्या स्वातंत्र्य सेनानींच्या विचारांचा स्पर्श त्यांच्या व्यक्तिमत्त्वाला झाला. स्वातंत्र्याच्या चळवळीत योगदान देताना त्यांना कारावासही भोगाव लागला.

स्वर्गीय जवाहरलाल दर्डा यांनी मराठी पत्रकारितेमध्ये ‘लोकमत’ची मुहूर्तमेढ रोवली. सद्यस्थितीत लोकमत वृत्तपत्र राज्यातच नव्हे, तर देशातील मराठी भाषेतील अग्रगण्य वृत्तपत्र आहे. सर्व प्रकारच्या प्रसारमाध्यमांमध्ये लोकमत आपल्याला दिसतो, त्याचे खरे श्रेय स्व बाबूजींना जाते, अशा शब्दात मुख्यमंत्री फडणवीस यांनी स्वर्गीय जवाहरलाल दर्डा यांच्या पत्रकारितेतील कार्याचा गौरवही केला.

0000

निलेश तायडे/विसंअ

 

 

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *