मुंबई शहर ग्रंथोत्सव २७ व २८ मार्चला; विविध साहित्यिक व सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन

मुंबई, दि. २३: मुंबई शहरचा जिल्हा ग्रंथोत्सव २७ व २८ मार्च २०२६ रोजी दादर (पूर्व) येथील मुंबई मराठी ग्रंथसंग्रहालयात होणार आहे. विविध साहित्यिक, सांस्कृतिक व वाचनविषयक कार्यक्रमांनी समृद्ध असा हा ग्रंथोत्सव होणार आहे.

२७ रोजी सकाळी ९.३० वाजता शालेय विद्यार्थ्यांच्या ग्रंथदिंडीने ग्रंथोत्सवाची सुरुवात होईल. त्यानंतर सकाळी ११ ते दुपारी १ या वेळेत मान्यवरांच्या उपस्थितीत उद्घाटन समारंभ होईल. दुपारच्या सत्रात ज्येष्ठ साहित्यिक रवींद्र पिंगे यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त ‘शब्दांचे देणे’ तसेच ‘लेखक तुमच्या भेटीला’ या कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.

२८ मार्च रोजी सकाळच्या सत्रात मराठीतील दुर्मीळ ग्रंथांचे प्रदर्शन, व्याख्यान, वाचक गौरव सोहळा आणि ‘वाचनयात्रा आनंदयात्रा’ या विषयावरील परिसंवाद आयोजित करण्यात आला आहे. दुपारच्या सत्रात ‘कथामंजिरी’ या कार्यक्रमांतर्गत नामवंत मराठी लेखकांच्या कथांचे आकर्षक सादरीकरण होणार आहे.

या दोन्ही दिवसांत सर्व वयोगटांसाठी शासकीय प्रकाशनांसह विविध खासगी प्रकाशक व विक्रेत्यांची विविध विषयांवरील पुस्तके उपलब्ध असतील. तसेच जिल्ह्यातील ग्रंथालयीन पदाधिकारी व सेवकांचा प्रातिनिधिक गौरव करून मान्यवरांच्या उपस्थितीत ग्रंथोत्सवाचा समारोप करण्यात येणार आहे.

मुंबईकर नागरिक, विद्यार्थी, ग्रंथप्रेमी व साहित्य रसिकांनी या ग्रंथोत्सवाचा लाभ घेण्याचे आवाहन मुंबई शहरचे जिल्हा ग्रंथालय अधिकारी, शशिकांत काकड यांनी केले आहे.

०००

काशीबाई थोरात/विसंअ

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *