मुंबई, दि. २७ : मुंबईसह उपनगरातील म्हाडाच्या ५६ इमारतींना म्हाडाकडून थकीत सेवाशुल्काची देयके भरण्याबाबत सर्वानुमते निर्णय घेतला जाईल, असे पर्यटन मंत्री शंभूराज देसाई यांनी सांगितले.
महाराष्ट्र विधानसभा नियम १०१ अन्वये विधानपरिषद लक्षवेधी क्र. ५६९ संदर्भात मुंबईसह उपनगरातील म्हाडाच्या ५६ इमारतींना थकीत सेवाशुल्काची देयके भरण्याबाबत बैठक पार पडली. यावेळी २०२१ ते २०२६ या कालावधीतील जुन्या दरानुसार सेवाशुल्कासंदर्भात प्रस्ताव तयार करण्याबाबत एकमत झाले. तसेच सदर प्रस्ताव उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या माध्यमातून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे पाठवून त्यांच्या समन्वयातून निर्णय घेतला जाईल, असे मंत्री शंभूराज देसाई यांनी सांगितले.
महाराष्ट्र विधानपरिषद नियम १०१ अन्वये विधानपरिषद लक्षवेधी क्र. ८२ अंतर्गत माहिम येथील मच्छीमार कॉलनी, पोलीस वसाहत, परिसरातील इतर वसाहती तसेच म्हाडा कॉलनी येथील इमारतींचा क्लस्टर पद्धतीने विकास करण्याबाबत बैठक पार पडली. या बैठकीत प्राथमिक स्तरावर सकारात्मक चर्चा झाली. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या माध्यमातून यावर धोरणात्मक निर्णय घेतला जाईल, असेही आश्वासन मंत्री शंभूराज देसाई यांनी दिले.
तसेच महाराष्ट्र विधानपरिषद तात्काळ प्रश्न क्र. ६८३१ अंतर्गत समता नगर, कांदिवली (पूर्व) येथील म्हाडा गृहनिर्माण संस्थेच्या इमारतींच्या पुनर्विकासाबाबत बैठक पार पडली. या बैठकीत भाडेकरूंना दिलासा देणारा निर्णय घेण्याबाबत एकमत झाले. त्यासाठी म्हाडा, मुंबईच्या माध्यमातून कालबद्ध कार्यक्रम तयार करण्याबाबतचे निर्देश मंत्री शंभूराज देसाई यांनी दिले.
या बैठकीसाठी गृहनिर्माण राज्यमंत्री डॉ. पंकज भोयर, आमदार श्रीकांत भारतीय, आमदार भाई जगताप, आमदार प्रविण दरेकर, माजी आमदार अनिल परब, आमदार प्रकाश सुर्वे, मुंबई मंडळाचे मुख्याधिकारी मिलिंद बोरीकर तसेच गृहनिर्माण विभागाच्या सहसचिव विद्या हम्पय्या उपस्थित होत्या.
0000
संध्या गरवारे / विसंअ