मुंबई, दि. १९ : पर्यावरण व वातावरणीय बदल विभागाच्या अंतर्गत असणाऱ्या माझी वसुंधरा अभियान आणि राज्य वातावरणीय बदल कक्षाच्या पुनर्रचनेसंदर्भात पर्यावरण वातावरणीय बदल विभागाच्या मंत्री पंकजा मुंडे यांनी आढावा घेतला. युवक, विद्यार्थी, महिला आणि सामाजिक प्रभावकांचा (इन्फ्लुएन्सर्स) मोठ्या प्रमाणावर सहभाग वाढविण्यावर भर द्यावा. तसेच जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत हवामान कृती आराखड्यांवर नियमित चर्चा व्हावी तसेच मंत्रिमंडळ बैठकीत दरमहा हवामान बदल विषयाचा आढावा घेण्यासंदर्भात पुढाकार घेणार असल्याचे यावेळी मंत्री मुंडे यांनी सांगितले.
यावेळी विभागाच्या सचिव जयश्री भोज, महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे सदस्य सचिव राहुल रेखावार, उपसचिव जॉय ठाकूर आदी उपस्थित होते.
मंत्री पंकजा मुंडे म्हणाल्या की, माझी वसुंधरा अभियान अधिक प्रभावी करण्यासाठी ‘वसुंधरा रक्षक’ ही संकल्पना प्रभावीपणे राबविण्यात यावी. पर्यावरण संवर्धनासाठी काम करणाऱ्या प्रत्येक नागरिकाला ‘वसुंधरा रक्षक’ म्हणून सहभागी करून घ्यावे. तसेच या अभियानात नागरिकांचा सहभाग वाढविण्यासाठी सोशल मीडियासारखे स्वतंत्र व्यासपीठ विकसित करण्यात यावे.
तसेच माझी वसुंधरा स्पर्धेतील मूल्यांकन पद्धत सुधारण्याची आवश्यकता असून मूल्यांकन पद्धतीत लोकसंख्येऐवजी प्रदूषणाचा निकष अधिक महत्त्वाचा असावा. त्यामध्ये नागरिकांनी केलेल्या वृक्षारोपण, पाणी पुनर्वापर, कापडी पिशव्यांचा वापर, सायकलिंग, नैसर्गिक शेती आदी पर्यावरणपूरक उपक्रमांना गुणांकनास प्राधान्य द्यावे. डोंगराळ, ग्रामीण आणि औद्योगिक भागातील स्थानिक परिस्थिती लक्षात घेऊन गुणांकन प्रणाली विकसित करण्याची गरज मंत्री मुंडे यांनी व्यक्त केली. नैसर्गिक शेती, रासायनिक खतांचा कमी वापर, मृदासंवर्धन, वृक्षारोपण, धूरमुक्त व धूळमुक्त गावे, पाण्याचा पुनर्वापर आणि अक्षय ऊर्जेचा वापर यांसारख्या बाबींना अभियानात विशेष प्राधान्य देण्याचे निर्देशही मंत्री मुंडे यांनी दिले.
राज्य वातावरणीय बदल कक्षाच्या पुनर्रचनेसंदर्भात स्वतंत्र आणि सक्षम यंत्रणा उभारण्याबाबत यावेळी चर्चा झाली. हवामान बदलाशी संबंधित धोरण आखणी, जनजागृती, प्रकल्प व्यवस्थापन, हवामान कृती आराखड्यांचे मूल्यमापन आणि हवामान वित्तपुरवठा यासाठी स्वतंत्र यंत्रणा उभारण्यासंदर्भात यावेळी चर्चा झाली. सध्या राज्यातील सात शहरांचे हवामान कृती आराखडे तयार करण्यात आले असून ९ शहरांचे आराखडे तयार करण्याची प्रक्रिया सुरू आहे. या धर्तीवर राज्यातील सर्वच शहरांचे हवामान कृती आराखडे तयार करण्यात यावेत, असे निर्देश मंत्री मुंडे यांनी दिले.
हवामान बदल हा भविष्यातील अत्यंत महत्त्वाचा विषय असून यामध्ये राज्यातील सर्वच विभागांशी समन्वय ठेवावा, असेही मंत्री मुंडे यांनी यावेळी सांगितले.
००००
नंदकुमार वाघमारे/विसंअ