महिलांना भरारी घेण्यासाठी कृषी नवीन प्रगतीचे क्षेत्र : राज्यमंत्री मेघना बोर्डीकर

सगरोळी कृषी विज्ञान केंद्रात महिला मेळावा

नांदेड दि. ३० जानेवारी : कृषी क्षेत्रामध्ये आवश्यक असलेला नीटनेटकेपणा, योग्य वेळेची निवड,नवनवीन प्रयोग, बाजाराचा अभ्यास व तंत्रज्ञानाचा वापर या बाबींचा आता महिलांनी देखील अभ्यास करावा. कृषी क्षेत्र देखील महिलांसाठी प्रगतीची नवी दिशा ठरू शकते असे प्रतिपादन,राज्याच्या  सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण, पाणीपुरवठा आणि स्वच्छता, ऊर्जा, महिला व बालविकास, सार्वजनिक बांधकाम ( सार्वजनिक उपक्रम) राज्यमंत्री मेघना बोर्डीकर साकोरे यांनी आज येथे केले. नांदेड जिल्हयातील कृषी विज्ञान केंद्र सगरोळी येथील कार्यक्रमात त्या बोलत होत्या.

शेतीमध्ये महिलांचे मोठे योगदान आहे. मात्र साह्यभूत भूमिका सोडून आता या क्षेत्रातही महिलांनी अधिक सक्रिय होणे आवश्यक असल्याचे त्यांनी यावेळी स्पष्ट केले .कृषी विज्ञान केंद्र सगरोळी सारख्या केंद्रांनी आता या दृष्टीने देखील प्रयत्न करावे. अशा महिलांना आणखी प्रशिक्षित करावे, असे आवाहनही त्यांनी यावेळी केले.

येथील कृषी विज्ञान केंद्रातर्फे आयोजीत कृषी तंत्रज्ञान महोत्सवात गुरुवार (ता.३०) रोजी महिला मेळाव्यास त्या संबोधित करीत होत्या. यावेळी विधान परिषदेच्या सदस्या चित्रा वाघ,जिल्हा महिला व बालविकास अधिकारी रूपाली रंगारी,उपविभागीय अधिकारी क्रांती डोंबे, प्रणीता देवरे चिखलीकर,उद्योजिका चंद्रिका चव्हाण, स्त्रीरोग तज्ञ डॉ. प्रियंका भालेराव, कर्करोग तज्ञ डॉ. सुप्रिया सोनजे, प्रा. प्रज्ञा कुलकर्णी उपस्थित होत्या.

कृषी क्षेत्रात अमूलाग्र बदल होत असून तंत्रज्ञान युगात युवतींना अनेक संधी  उपलब्ध आहेत.कृषी क्षेत्रात ड्रोनचा वापर मोठ्या प्रमाणात होणार असून ड्रोन पायलट बनण्याची संधी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी उपलब्ध करून दिली आहे,अशा अनेक योजना केंद्र व राज्य शासनातर्फे राबविल्या जात आहेत. त्यातून महिला आत्मनिर्भर, सक्षम व आरोग्यमय होतील, याची खात्री असल्याचे बोर्डीकर म्हणाल्या.

आमदार चित्रा वाघ यांनी, हर घर शौचालय व लखपती दीदी अशा योजनांचा  महिलांनी लाभ घ्यावा. नावासमोर आईचे नाव जोडून शासनाने महिलांचा सन्मान केला आहे. कौटुंबिक अत्याचार रोखण्यासाठ एकशेबारा डायल करावा असे आवाहन केले. शासनाने लखपती दिदिसाठी अकरा कोटी तर बचत गटाच्या सक्षमीकरणासाठी दहा हजार कोटी निधीची तरतूद केली असल्याचे सांगितले. महिलांनी उभारलेल्या प्रदर्शनींना भेटी देऊन संवाद साधला. चंद्रिका चव्हाण यांनी महिलांसाठी उद्योगाच्या संधी, डॉ भालेराव यांनी स्त्रियांचे आरोग्य व डॉ. सोनजे यांनी कर्करोग निदान व उपचार तर प्रा. कुलकर्णी यांनी, निरामय, निरोगी आयुष्याची गुरुकिल्ली याचा कानमंत्र दिला. यावेळी यावेळी परिसरातील महिलांची मोठया संख्येने उपस्थिती होती.

The post महिलांना भरारी घेण्यासाठी कृषी नवीन प्रगतीचे क्षेत्र : राज्यमंत्री मेघना बोर्डीकर first appeared on महासंवाद.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *