महिलांना उद्योगासाठी प्रवृत्त करून जिल्ह्यात उद्योग वाढीसाठी प्रयत्न करा – पालकमंत्री चंद्रकांत पाटील

महिला व बाल विकास, उद्योग केंद्राने परस्पर समन्वय ठेवण्याचे निर्देश

सांगली, दि. 15  (जि. मा. का.) : जिल्हा महिला व बाल विकास विभागाने महिलांना उद्योगासाठी प्रवृत्त करावे व त्या महिलांनी जिल्ह्यात छोटे मोठे उद्योग सुरू करण्यासाठी जिल्हा उद्योग केंद्राने प्रयत्न करावा, असे निर्देश पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी आज येथे दिले.

जिल्हाधिकारी कार्यालयातील बैठक सभागृहात जिल्हा उद्योग केंद्राकडील विविध योजनांच्या आढावा बैठकीच्या अध्यक्षस्थानावरून ते बोलत होते. यावेळी जिल्हाधिकारी अशोक काकडे, निवासी उपजिल्हाधिकारी डॉ. स्नेहल कनिचे, जिल्हा उद्योग केंद्राच्या महाव्यवस्थापक विद्या कुलकर्णी, मा. पालकमंत्री महोदयांचे विशेष कार्य अधिकारी बाळासाहेब यादव आदि उपस्थित होते.

पालकमंत्री चंद्रकांत पाटील म्हणाले, जिल्हा उद्योग केंद्राने जिल्ह्यात उद्योग वाढविण्यासाठी मुख्यमंत्री रोजगार निर्मिती, सामूहिक प्रोत्साहन योजना अशा विविध शासकीय योजनांच्या माध्यमातून प्रयत्न करावेत. सामूहिक प्रोत्साहन योजनेंतर्गत महिलांना माहिती देऊन उद्योग उभारण्यासाठी प्रयत्न करावेत. ज्या या योजना 5 टक्के बीज भांडवल, 35 टक्के अनुदान व उर्वरित कर्ज अशा स्वरूपात राबवल्या जातात. उद्योगाची मर्यादा एक लाख रूपये असणाऱ्या उद्योगासाठी आपण स्वत: बीज भांडवलाची रक्कम उभा करून देऊ, असे त्यांनी आश्वासीत केले. तसेच, महाविद्यालयीन युवतींनाही कमवा व शिका या तत्त्वावर शिक्षणासाठी मदत म्हणून प्रायोगिक तत्त्वावर विलिंग्डन महाविद्यालय परिसरात एखादे युनिट सुरू करण्यासाठी कार्यवाही करण्याच्या सूचना त्यांनी यावेळी दिल्या.

जिल्हाधिकारी अशोक काकडे म्हणाले, सकारात्मक दृष्टीकोन ठेऊन शासनाच्या विविध योजनांच्या माध्यमातून जिल्ह्यात उद्योग उभारणीच्या माध्यमातून महिलांचे सबलीकरण करण्यासाठी प्रयत्न करावेत, असे आवाहन केले.

यावेळी जिल्हा उद्योग केंद्राच्या महाव्यवस्थापक विद्या कुलकर्णी यांनी उद्योग केंद्रामार्फत जिल्ह्यात उद्योग वाढीसाठी करण्यात येत असलेल्या विविध योजनांबद्दल सविस्तर सादरीकरण केले.

000

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *