मुंबई, दि. ६ : महारेराच्या प्रलंबित वसुलीसाठी कालबद्ध कार्यक्रम राबवून प्रभावी अंमलबजावणी करा, असे निर्देश प्रभारी गृहनिर्माणमंत्री शंभूराज देसाई यांनी दिले. यासोबतच वसूलीचा सखोल आढावा घेऊन उर्वरित शिल्लक रक्कम दिलेल्या कालमर्यादेत पूर्ण करण्यावर भर द्यावा आणि वसूली प्रक्रियेत विलंब करणाऱ्या प्रकरणांवर कठोर कारवाई करावी, असेही त्यांनी स्पष्ट केले.
राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिलेल्या जबाबदारीनुसार प्रभारी गृहनिर्माणमंत्री शंभूराज देसाई यांनी विधिमंडळ अधिवेशनादरम्यान लोकप्रतिनिधींनी उपस्थित केलेल्या तारांकित प्रश्न व लक्षवेधींवर मुंबईत बैठका घेऊन सविस्तर आढावा घेतला. महाराष्ट्र स्थावर संपदा प्राधिकरण (महारेरा) यांच्या आदेशांची प्रभावी अंमलबजावणी सुनिश्चित करण्यासाठी संबंधित विभागाने तातडीने ठोस आणि कालबद्ध कृती करावी, असे निर्देश त्यांनी दिले.
सदर बैठक सह्याद्री अतिथिगृह, मुंबई येथे पार पडली. बैठकीस आमदार अतुल भातखळकर, उपायुक्त कोकण विभाग (कोकण भवन), तसेच मुंबई शहर, मुंबई उपनगर, ठाणे, पुणे रायगड व पालघर येथील निवासी जिल्हाधिकारी उपस्थित होते. बैठकीत महारेरा आदेशांच्या अंमलबजावणीतील प्रलंबित प्रकरणांचा सविस्तर आढावा घेण्यात आला. संबंधित विभागाला तातडीने आवश्यक कार्यवाही करून वसूलीचे प्रमाण वाढविण्याचे निर्देश देण्यात आले.
विशेषतः, विधानसभा तारांकित प्रश्नानंतर झालेल्या वसूलीचा तपशील सादर करून शिल्लक रक्कम निश्चित कालमर्यादेत वसूल करण्यावर भर देण्यात आला. जिल्हास्तरावर समन्वय अधिक प्रभावी करून प्रकरणांचा जलद निपटारा करावा, तसेच आदेशांची अंमलबजावणी टाळणाऱ्या संबंधितांविरुद्ध आवश्यक ती कठोर कारवाई करावी, अशा सूचनाही यावेळी देण्यात आल्या.
००००
संध्या गरवारे/विसंअ