‘महाराष्ट्र युवा जलदूत’ देणार जलसंधारणाचा संदेश

जन्मापासून प्रत्येकाची जडण-घडण ही माती व पाण्याच्या सानिध्याने होत असते. ती जशी माणसांची तशी पशु, पक्षी, प्राणी आणि वृक्षांची तसेच माती व पाण्यावर अवलंबून सर्वच जिवजंतूंची आहे. वर्षानुवर्ष ही पद्धत अशीच टिकून आहे. मात्र, बदलते हवामान व परिस्थितीमुळे ही नैसर्गीक देणगी धोक्यात येण्याची स्थिती निर्माण होत आहे. म्हणूनच शेती व पर्यावरणासह शाश्वत विकासासाठी जल संरक्षणाची नितांत गरज आहे आणि आवश्यकता आहे हा संदेश पुढच्या पिढीकरिता आजच्या युवा पिढीकडून आजच्या भाषेत पोहचण्याची. त्यासाठीच राज्य शासनाच्या मृद व जलसंधारण विभागाने तरुणांचा आवाज जास्तीत जास्त लोकांपर्यंत प्रभावीपणे पोहचविण्यासाठी इंस्टाग्राम रिल्स स्पर्धेच्या माध्यमातून कल्पकतेचा मार्ग प्रशस्थ करण्याचा निर्णय घेतला. जलसंधारणाच्या जागरूकतेत योगदान देत तरुणांना ‘महाराष्ट्र युवा जलदूत’ बनन्यासाठी रिल्सचे मोठे दालनच खुले झाले आहे.

राज्यातील विद्यापीठे , महाविद्यालये व शाळांमध्ये शिक्षण घेणारे विद्यार्थी, एनएसएस स्वयं सेवक,एनसीसी कॅडेट्स,नेहरु युवा केंद्र ,क्रीडा व युवक संस्था,स्वयंसेवी संस्था, पर्यावरण संस्थांमध्ये कार्यरत युवक-युवती,इंस्टाग्राम क्रिएटर्स,युटयूबर्स,सोशल मिडीया इन्फ्ल्युएंन्सर्सना या स्पर्धेत सहभागी होत “एक रिल…. मातीसाठी ! एक रिल …. पाण्यासाठी!,एक रिल…सुरक्षित भविष्यासाठी !” हा संदेश सर्वदूर पोहचवून मोलाचे योगदान देता येणार आहे.

मृद संधारण व जलसंधारण हा शाश्वत विकासाचा पाया आहेत. राज्यातील अनेक भागात खालावलेली भूजल पातळी लक्षात घेता पाणलोट विकास आणि भूजल पुर्नभरणावर भर देण्यासाठी राज्यात तत्कालीन मुख्यमंत्री सुधाकरराव नाईक यांनी ‘पाणी अडवा, पाणी जिरवा’ हा मूलमंत्र देवून राज्यात जलसंधारणाची मोठी चळवळ उभारली. त्यांच्या या योगदानाचे कायम स्मरण रहावे म्हणूनच राज्यशासनाने ३ जुलै २०२६ रोजी शासन निर्णय निर्गमीत करून माजी मुख्यमंत्री सुधाकरराव नाईक यांचा जन्मदिन २१ ऑगस्ट हा जलसंधारण दिन म्हणून साजरा करण्याचा निर्णय घेतला. या औचित्याने जलसंधारणाविषयी व्यापक जागरुकता निर्माण करण्यासाठी शासनाने युवापिढीवर विश्वास टाकत एक जबाबदारीही दिली आहे. अर्थात त्यासाठीच या पिढीच्या कल्पकतेला साद घालत जलसंधारणाचा संदेश सर्वदूर पोचविण्यासाठी इंस्टाग्राम रिल्स स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.

जलसंधारण दिनाच्या पार्श्वभूमीवर राज्यभर १५ ते २१ ऑगस्ट दरम्यान ‘जलसंधारण सप्ताह’ तर १५ ऑगस्ट २०२६ ते२६ जानेवारी २०२७ या कालावधीत ‘जलसंधारण अभियान’ आयोजित करण्यात येत आहे. जलसंधारण सप्ताहाच्या निमित्ताने राज्यातील सर्वच ३६ जिल्ह्यांमध्ये विविध जनजागरुकता कार्यक्रम राबविण्यात येत आहेत. या सप्ताहामध्ये आयोजित ‘मृद व जलसंवर्धन रिल्स स्पर्धा’ ही युवा पिढीच्या कल्पकतेसाठी मोठा मंच असणार आहे. राज्यातील १५ ते ३० वयोगटातील युवक-युवतींच्या कल्पकतेचा उपयोग करून इंस्टाग्राम या समाजमाध्यमाद्वारे राज्याच्या कानाकोपऱ्यात मृद व जलसंधारणाबाबत व्यापक जनजागृती निर्माण करण्यासाठी राज्यव्यापी ‘Reel for Soil and Water Conservation’ स्पर्धा घेण्यात येत आहे.

या स्पर्धेची संकल्पना ‘Save Soil, Save Water, Secure Tomorrow’ ठेवण्यात आली आहे. या सर्व स्पर्धेतील कल्पक संदेश एकाच ठिकाणी उपलब्ध होण्यासाठी #SaveSoilSaveWater हा हॅशटॅग वापरला जात आहे. राज्यातील सर्वच जिल्ह्यांमध्ये १५ ते ३० वयोगटातील युवक-युवतींसाठी ही स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. प्रत्येक स्पर्धकाला ३० ते ६० सेकंद मर्यादेत इंस्टाग्राम रिल तयार करायची आहे. ही रिल तयार करताना सुरुवातीलाच रीलचा उद्देश, स्पर्धकाचे व जिल्ह्याचे नाव नमूद करावे लागणार आहे. तयार केलेली पब्लीक इंन्स्टाग्राम अकाऊंटवर पोस्ट करायची आहे. पोस्ट करताना मृद व जलसंधारण विभागाच्या अधिकृत इंस्टाग्राम अकाऊंटला टॅग करणे आणि #SaveSoilSaveWater हा हॅशटॅग वापरणे अनिवार्य आहे. यासोबतच स्पर्धेसाठी तयार करण्यात आलेला क्युआर कोड स्कॅनकरून तिथे शासनाकडे सहभागाची नोंद करण्यासाठी रिलची लिंक जिल्ह्यानुसार पेस्ट करायची आहे.

प्रत्येक स्पर्धकाला १५ ते १९ ऑगस्ट दरम्यान जास्तीत-जास्त तीन रिल अपलोड करता येणार आहेत. मातीची धूप,पाणी बचत, पावसाच्या पाण्याचे संकलन, शेततळी, बंधारे, वृक्षारोपण, माती व पाणी वाचविण्याच्या नाविन्यपूर्ण कल्पना,गावातील यशस्वी मृद व जलसंधारण कामे, भूजल पुनर्भरण आणि पर्यावरण संवर्धन या विषयांवर रिलद्वारे संदेश देता येणार आहे. अभिनय, संगीत, विनोद, लघुपट, ॲनिमेशन, कृत्रिम बुद्धिमत्ता, ड्रोन दृश्ये किंवा अन्य नाविन्यपूर्ण माध्यमांचा वापर करून युवक -युवतींना आपली कल्पकता सादर करता येणार आहे. केवळ लाईक्स किंवा फॉलोअर्सवर विजेता निश्चित न करता विषय व संदेशासाठी ३० गुण, कल्पकतेसाठी २५ गुण,प्रभावी सामाजिक संदेशाकरिता २० गुण, सादरीकरण व तांत्रिक गुणवत्तेसाठी १५ तर इंस्टाग्राम एंगेजमेंटकरिता १० असे एकूण १०० गुण देण्यात येणार आहे.उत्तम गुणांकानुसार प्रत्येक जिल्हाधिकारी हे संबंधित जिल्ह्यातील सर्वोत्तम तीन रिल निवडतील व महाराष्ट्र युवा जलदूत नावाने त्यांना २५ हजारांचे प्रथम पारितोषिक ,१५ हजारांचे द्वितीय तर १० हजारांचे तृतिय पारितोषिक सन्मान चिन्ह व प्रशस्ती पत्रासहित प्रदान करणार आहेत. उत्कृष्ट सहभागींना ई-प्रमाणपत्र प्रदान करण्यात येणार आहे.

माती आणि पाणी ही नैसर्गीक संसाधने एकमेकांवर अवलंबून आहेत व भविष्यातील पिढीसाठी त्यांचे रक्षण करणे अत्यंत आवश्यक आहे. या संसाधन रक्षणाच्या जनजागृतीसाठी राज्यातील युवा पिढी विक्रमी डिजिटल लोकचळवळ उभारुन ही जबाबदारी स्वीकारतील आणि प्रत्येक युवकांची कल्पक रिल ही या चळवळीची ताकद ठरेल.

रितेश मो.भुयार,

माहिती अधिकारी

जिल्हा माहिती कार्यालय,
अमरावती.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *