• शेतकऱ्यांना मदतीचा आधार, युवकांना रोजगाराची संधी
• शासनाच्या कल्याणकारी योजनांचा लाभ तळागाळातील नागरिकांपर्यंत पोहोचविण्यावर भर
• समाधान शिबिरातून ३३ हजारांहून अधिक लाभार्थ्यांना लाभ
• ‘महा वॉकेथॉन-वॉक फॉर वॉटर’मध्ये सहभागी होण्याचे आवाहन
बुलढाणा, दि. १५ : कृषिप्रधान बुलढाणा जिल्ह्याने कृषी, शेतकरी कल्याण, उद्योग, कौशल्य विकास, आरोग्य, सामाजिक न्याय, क्रीडा, पर्यटन आणि पर्यावरण संवर्धनाच्या क्षेत्रात उल्लेखनीय प्रगती केली आहे. शासनाच्या विविध कल्याणकारी योजनांचा लाभ थेट नागरिकांपर्यंत पोहोचविण्यासाठी प्रशासनामार्फत प्रभावीपणे काम करत आहे, असे प्रतिपादन मदत व पुनर्वसन मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री मकरंद जाधव पाटील यांनी केले.
देशाच्या 80 व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात पालकमंत्री मकरंद जाधव पाटील यांच्या हस्ते मुख्य शासकीय ध्वजारोहण करण्यात आले, त्यावेळी ते बोलत होते. या कार्यक्रमाला आमदार संजय गायकवाड, आमदार मनोज कायंदे, जिल्हाधिकारी डॉ. प्रविणकुमार देवरा, मुख्य कार्यकारी अधिकारी गुलाब खरात, पोलीस अधीक्षक निलेश तांबे, स्वातंत्र्य सेनानी, वीर माता, पत्नी, अधिकारी व कर्मचारी, विद्यार्थी, पत्रकार, नागरिक उपस्थित होते.
स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा व्यक्त करत पालकमंत्री मकरंद जाधव पाटील पुढे म्हणाले, स्वातंत्र्यानंतर भारताने अनेक क्षेत्रांत प्रगती केली आहे. कृषी, उद्योग, विज्ञान-तंत्रज्ञान, शिक्षण, आरोग्य यासह सर्व क्षेत्रांत महत्त्वपूर्ण यश संपादन केले आहे. आजचे युवक ही डिजिटल भारताची शक्ती आहे. नवीन तंत्रज्ञान आत्मसात करणे, समस्या सोडविण्यासाठी नावीन्यपूर्ण मार्ग शोधणे आणि देशासाठी योगदान देण्याची जिद्द ही युवकांची ताकद आहे. युवकांच्या कल्पना, नवोन्मेष आणि ऊर्जेतून विकसित महाराष्ट्र घडविण्याची क्षमता आहे.
पालकमंत्री मकरंद जाधव पाटील पुढे म्हणाले, यावर्षी आतापर्यंत ४०५.५० मिमी म्हणजेच ५३.२४ टक्के पाऊस झाला आहे. खरीप हंगामात ७ लाख १० हजार हेक्टर क्षेत्रावर, म्हणजेच ९६.४५ टक्के पेरणी पूर्ण झाली आहे. प्रधानमंत्री कृषी सिंचन योजनेअंतर्गत ११ हजार ६२ लाभार्थ्यांना ३६ कोटी ८२ लाख रुपये, मुख्यमंत्री शाश्वत सिंचन योजनेतून १० हजार ८६४ लाभार्थ्यांना १७ कोटी ७९ लाख ३६ हजार रुपये, तर अटल भूजल योजनेअंतर्गत ३६२ लाभार्थ्यांना ७८ लाख ५० हजार रुपयांचे अनुदान देण्यात आले आहे. शेतकरी कुटुंबांना आधार देणाऱ्या गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात सानुग्रह अनुदान योजनेतून सन २०२५-२६ मध्ये १३३ प्रकरणांसाठी २ कोटी ६२ लाख रुपयांचे अनुदान वितरित करण्यात आले आहे.
सूक्ष्म अन्नप्रक्रिया उद्योगांना चालना
ग्रामीण भागातील उद्योग आणि रोजगाराला चालना देण्यासाठी प्रधानमंत्री सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग योजना प्रभावीपणे राबविण्यात येत आहे. ‘एक जिल्हा, एक उत्पादन’ या संकल्पनेअंतर्गत प्रकल्पांना ३५ टक्के अनुदान देण्यात येते. आतापर्यंत ९७५ प्रस्तावांसाठी ३२ कोटी ५८ लाख रुपयांचे अनुदान वितरित करण्यात आले आहे.
आपत्तीग्रस्त शेतकऱ्यांना विक्रमी मदत
मदत व पुनर्वसन विभागाने जानेवारी २०२५ ते जून २०२६ या १८ महिन्यांच्या कालावधीत राज्यातील आपत्तीग्रस्त १ कोटी ५४ लाखांहून अधिक लाभार्थ्यांच्या खात्यात २१ हजार ५४३ कोटी रुपयांची विक्रमी मदत थेट जमा केली आहे. यामध्ये बुलढाणा जिल्ह्यातील ६ लाख ७७ हजार बाधित शेतकऱ्यांना शेतीपिके व जमीन नुकसानीपोटी ४५५ कोटी ९८ लाख रुपयांची मदत थेट त्यांच्या खात्यावर जमा करण्यात आली आहे.
पीक विमा योजनेत शेतकऱ्यांचा सहभाग
नैसर्गिक आपत्तीमुळे होणाऱ्या नुकसानीपासून आर्थिक संरक्षण देणारी प्रधानमंत्री पीक विमा योजना शेतकऱ्यांसाठी मोठा आधार ठरत आहे. खरीप २०२४-२५ मध्ये ५ लाख ९८ हजार शेतकऱ्यांना ७१४ कोटी रुपयांची नुकसानभरपाई वितरित करण्यात आली आहे. खरीप २०२६-२७ साठी आतापर्यंत २ लाख ५५ हजार शेतकऱ्यांनी पीक विमा योजनेत सहभाग नोंदविला आहे.
२ लाख २७ हजारांहून अधिक शेतकऱ्यांना कर्जमुक्तीचा लाभ
शासनाच्या महत्त्वाकांक्षी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजनेअंतर्गत पात्र शेतकऱ्यांची पहिली यादी जाहीर करण्यात आली आहे. जिल्ह्यातील सुमारे २ लाख २७ हजार ६४६ शेतकऱ्यांना कर्जमुक्ती आणि प्रोत्साहनपर लाभ मिळणार आहे.
रोजगार निर्मितीत जिल्ह्याची दमदार कामगिरी
सन २०२५-२६ मध्ये मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम आणि प्रधानमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रमांतर्गत जिल्ह्याने १०० टक्के लक्ष्य पूर्ण केले आहे. या योजनांच्या माध्यमातून १ हजार १२० रोजगारांची निर्मिती करण्यात यश आले आहे. उद्योजक, व्यावसायिक, श्रमिक आणि प्रशासनाच्या एकत्रित प्रयत्नांतून जिल्ह्याच्या आर्थिक विकासाला चालना मिळत आहे.
पर्यावरण संवर्धनावर भर
राज्यात पर्यावरण संतुलन आणि हरित आच्छादन वाढविण्यासाठी २०४७ पर्यंत ३०० कोटी वृक्ष लागवडीचे महत्त्वाकांक्षी उद्दिष्ट निश्चित करण्यात आले आहे. बुलढाणा जिल्ह्यासाठी दरवर्षी १० लाख वृक्ष लागवडीचे उद्दिष्ट ठेवण्यात आले असून वृक्ष लागवडीचे काम वेगाने सुरू आहे.
आरोग्य, शिक्षण आणि सामाजिक न्यायाला प्राधान्य
‘माझे गाव, आरोग्य संपन्न गाव’ या मोहिमेतून ग्रामस्तरावर आरोग्य सुधारण्यासाठी व्यापक प्रयत्न सुरू आहेत. माता व बाल आरोग्य, लसीकरण तसेच मुलींच्या संरक्षणासाठी विविध अभियान राबविण्यात येत आहेत. सामाजिक न्याय विभागामार्फत विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती, वसतिगृहे, निवासी शाळा तसेच विविध योजनांचा लाभ दिला जात आहे. त्यामुळे वंचित व दुर्लक्षित घटकातील विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात येण्याची संधी उपलब्ध झाली आहे.
समाधान शिबिरातून ३३ हजारांहून अधिक लाभार्थ्यांना लाभ
शासनाचा कारभार लोकाभिमुख, पारदर्शक आणि गतिमान करण्याच्या उद्देशाने बुलढाणा जिल्ह्यात २२ जुलै ते २ ऑगस्ट या कालावधीत छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिरांचे आयोजन करण्यात आले. या शिबिरांना नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. विविध शासकीय योजनांची माहिती नागरिकांपर्यंत पोहोचविण्यासोबतच जिल्ह्यातील ३३ हजार ६७४ लाभार्थ्यांना विविध योजनांचा लाभ आणि साहित्याचे वितरण करण्यात आले.
कौशल्य विकासातून ५ हजारांहून अधिक युवकांना रोजगार
जिल्ह्यातील कौशल्य विकास कार्यक्रमांतर्गत २२ हजार ३६४ उमेदवारांनी नोंदणी केली असून ५ हजार ३०७ तरुणांनी रोजगाराचे स्वप्न साकार केले आहे. युवकांना कौशल्य प्रशिक्षण, रोजगार आणि स्वयंरोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्यावर प्रशासनाचा भर आहे.
क्रीडा क्षेत्रातही बुलढाण्याची उल्लेखनीय कामगिरी
जिल्ह्यात सुमारे ४४ हजार खेळाडू विविध क्रीडा उपक्रमांमध्ये सहभागी होत आहेत. ९६ क्रीडा प्रकारांच्या जिल्हास्तरीय स्पर्धांचे आयोजन करण्यात येत आहे. जिल्ह्यातील १२ खेळाडूंनी आंतरराष्ट्रीय स्तरावर पदके मिळवून बुलढाणा जिल्ह्याचा गौरव वाढविला आहे.
पर्यटन विकासाला नवी दिशा
लोणार सरोवर, संत गजानन महाराजांची भूमी शेगाव आणि राजमाता जिजाऊ साहेबांचे जन्मस्थळ सिंदखेड राजा यांसारखी ऐतिहासिक व धार्मिक स्थळे जिल्ह्याच्या पर्यटन विकासाला नवी उभारी देत आहेत. राजमाता जिजाऊ यांच्या जन्मस्थळाच्या सर्वांगीण विकासासाठी सविस्तर विकास आराखडा तयार करण्याचे काम सुरू आहे.
‘महा वॉकेथॉन-वॉक फॉर वॉटर’मध्ये सहभागी होण्याचे आवाहन
मृद व जलसंधारण विभागामार्फत २१ ऑगस्ट रोजी राज्यभर जलसंधारण दिन साजरा करण्यात येणार आहे. यानिमित्त राज्यव्यापी ‘महा वॉकेथॉन-वॉक फॉर वॉटर’सह विविध कार्यक्रम आयोजित करण्यात येणार आहेत. नागरिकांनी या उपक्रमात उत्स्फूर्तपणे सहभागी व्हावे, असे आवाहन पालकमंत्री मकरंद जाधव पाटील यांनी केले. कृषी, क्रीडा, सामाजिक न्याय, कौशल्य विकास, महिला सक्षमीकरण, पर्यटन, उद्योग, शिक्षण आणि आरोग्य अशा प्रत्येक क्षेत्रात बुलढाणा जिल्हा विकासाची नवी वाट निर्माण करीत आहे. स्वातंत्र्य दिनाच्या पवित्र प्रसंगी विकसित, समृद्ध, आत्मनिर्भर आणि सक्षम भारत घडविण्याचा निर्धार करूया, असे आवाहन त्यांनी केले.
या मुख्य ध्वजारोहण समारंभात पोलीस प्रशासनातील उल्लेखनीय कार्य करणारे अधिकारी-कर्मचारी, जिल्हा परिषदेअंतर्गत उत्कृष्ट ग्रामपंचायती आणि गुणवंत विद्यार्थ्यांना पालकमंत्री मकरंद जाधव पाटील यांच्या हस्ते प्रमाणपत्र प्रदान करून गौरविण्यात आले. यावेळी तंबाखूमुक्तीची शपथही घेण्यात आली.
००००