महाबळेश्वरमधील ६० कुटुंबांना दिलासा, लीज प्रॉपर्टी मधील जागा कामगारांना निर्वाहासाठी देण्याचे महसूल मंत्र्यांचे निर्देश

मुंबई, दि. ६ : महाबळेश्वर येथे शासनाच्या जागेवरील लीज प्रॉपर्टीमध्ये वर्षानुवर्षे ६० कामगार कुटुंबे काम करत आहेत. या प्रॉपर्टीवरील लीज संपल्यामुळे ही कुटुंबे बेघर होऊ शकतात. यामुळे २५ मार्च २०२६ च्या शासन निर्णयानुसार सर्वेक्षण करुन पात्र कुटुंबांना नियमानुसार जागा उपलब्ध करुन देण्याबाबत प्रस्ताव सादर करावा, असे निर्देश महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिले.

महाबळेश्वर येथील विविध प्रश्नांबाबत महसूल मंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयात बैठक झाली. यावेळी महाबळेश्वर येथील लीज प्रॉपर्टीमध्ये काम करणाऱ्या कुटुंबीयांचे प्रतिनिधी उपस्थित होते.

महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले, शासनाने सर्वांसाठी घरे ही संकल्पना मांडली असून त्यासाठी २५ मार्च रोजीच्या शासन निर्णयानुसार २०११ पूर्वी शासकीय जागेवर असलेले अतिक्रमण नियमानुकुल करण्याचा निर्णय घेतला आहे. त्या निर्णयाचा आधार घेऊन महाबळेश्वर येथील लीज प्रॉपर्टीमध्ये वर्षानुवर्षे काम करणाऱ्या कामगारांचे सर्वेक्षण करुन पात्र ठरणाऱ्या कुटुंबीयांना नियमानुसार देय ठरणाऱ्या जागेबाबतचा प्रस्ताव जिल्हाधिकारी यांनी शासनाकडे सादर करावा, असे निर्देश त्यांनी दिले.

या निर्णयामुळे लीज प्रॉपर्टी मध्ये वर्षानुवर्षे काम करणाऱ्या कामगारांच्या कुटुंबीयांना दिलासा मिळणार आहे.

00000

बी.सी.झंवर/विसंअ

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *