मराठीचे भवितव्य: आपली जबाबदारी

“माय मराठी भाषा नांदावी आपल्या ओठावर,

 तिचे आषाढ मेघ बरसावे आपल्या जीवनावर

 इथे तिथे वाचता यावा तिच्या अक्षरांचा चेहरा,

 तिच्या अमृतशब्दांना करावा मानाचा मुजरा”

मराठी भाषेला मानाचा मुजरा करावा इतपत आपली भाषा समृद्ध आहे. मराठी भाषा प्राचीन म्हणजेच सुमारे 2400 वर्षांची आहे. बाराव्या शतकात संत ज्ञानेश्वरांनी तिचा गुणगौरव केला आहे. भारतात मराठी तिसऱ्या क्रमांकाची बोलली जाणारी भाषा आहे. सुमारे १५ कोटी लोक ही भाषा व्यवहारात वापरतात.  मराठी भाषेतून ज्ञानपीठ पुरस्कार प्राप्त झालेले मराठीत साहित्यिक आहेत. महाराष्ट्रात तिला महाराष्ट्राची राज्यभाषा म्हणून मान्यता प्राप्त झाली आहे.

मराठी भाषेत एका शब्दांचे अनेक अर्थ उपलब्ध आहेत. भाषेमध्ये लवचीकता हा तीचा मुलभूत गुण आहे. मराठीचा गोडवा आपणास अधिक भावतो.

भाषेचा वापर मुख्यत: आपल्या घरातून सुरूवात व्हायला हवा. मराठी माणूस भेटल्यानंतर अथवा रिक्षा टॅक्सीवाल्यांशी आपण मराठीतच बोलले पाहिजे, रस्त्यावरच्या व्यावसायिक पाट्याही मराठीत असाव्यात, बस स्टॅन्ड, रेल्वे स्टेशन जिथे जिथे समूह असतात तिथे मराठी भाषा आपण बोलली पाहिजे.

मराठी साहित्य, ग्रंथ, शाळा, शिक्षण, वर्तमानपत्र, दुरदर्शन, मराठी मालिका, चित्रपट, यामुळेही आपली भाषा समृद्ध होते. शासकीय कार्यालये व न्याय व्यवस्थेमध्ये मराठी भाषेचा प्राधान्याने वापर व्हायला हवा. जे काही थोडे बहूत इंग्रजी शब्द मराठीत रूजलेत ते तसेच राहिले तरी मराठी भाषा उन्नत होईल. लहान मुलांना मराठी गोष्टीचे चांदोबा, इसापनिती, राष्ट्रपुरूष, महापुरूष, थोर व्यक्तींची चरित्र वाचायला द्यायला हवीत. त्यांना मराठीतून कथा सांगायला हव्यात, मुलांना बाजारातून फिरवताना त्यांस विविध वस्तूंची नावे मराठीतूनच सांगायला हवीत.

मराठी भाषा बोलण्यामुळे आपणास कमीपणा येतो ही न्यूनगंडाची भावना आपण दूर करायला हवी. वास्तविक आपण इतरांना मराठी भाषेची गोडी लावायला हवी, प्रोत्साहीत करायला हवे. मराठी भाषेतील ज्ञान आपणास अचंबित करेल, इतके विविध विषयातील अफाट शब्द भांडार मराठीत आहे.

१ मे महाराष्ट्र दिन व २७ फेब्रुवारी मराठी भाषा गौरव दिन म्हणून विविध मराठी संस्था साजरा करतात. त्यात आपण हिराहिरीने भाग घ्यायला हवा मराठी भाषा संवर्धन करायला हवी, हे आपले आद्य कर्तव्य आहे. मराठीला अभिजात भाषेचा दर्जा मिळाल्याने नवचैतन्य मिळेल. साहित्य क्षेत्राशी निगडीत विविध संस्थानी मराठीला गतवैभव प्राप्त व्हावे, तीचे संवर्धन व्हावे यासाठी कार्यरत राहावे लागेल.

मराठी भाषेतील अहिराणी, माणदेशी, मालवणी, कोळी, कोल्हापूरी, चंदगडी, बोली, बेळगावी, मराठवाडी, नागपूरी, वऱ्हाडी, जाडी बोली , तंजावर मराठी, नारायणपेठी बोली, भटक्या विमुक्त हे प्रवाह जतन व्हायला हवेत. वरील सर्व बोलीभाषेतील साहित्यिक आपल्या परीने विविध माध्यमातून भाषेला जिवंत ठेवण्याचा प्रयत्न करीत आहेत. राज्यशासन देखील मराठीच्या संवर्धनासाठी विविध निर्णय घेत आहे. तसेच शासकीय व्यवहारात मराठी भाषा वापरण्याबाबत शासन‍ निर्णय निर्गमित केलेले आहेत. त्याची ही अंमलबजावणी काटेकोरपणे केल्यास मराठी भाषाचे उत्कृष्ट संवर्धन होईल, असे वाटते.

संत ज्ञानेश्वर यांचे बोलच मराठीला तारतील.

माझा मराठीची बोलू कौतूके!

परी अमृतातेहि पैजासी जिंके!

ऐसी अक्षरे रसिके! मेळवीन!!

०००

–      मारूती कटकधोंड, सोलापूर 9881124450

The post मराठीचे भवितव्य: आपली जबाबदारी first appeared on महासंवाद.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *