भारत-रशिया भागीदारीत महाराष्ट्र महत्त्वपूर्ण भूमिका बजावण्यास सज्ज – मंत्री ॲड. आशिष जयस्वाल

मुंबई, दि. १३: भारत-रशिया व्यापार ६५ अब्ज डॉलर्सवर पोहोचला आहे आणि ही फक्त सुरुवात आहे. पुढील संधी अधिक मोठ्या आहेत आणि या भागीदारीत महाराष्ट्र महत्त्वपूर्ण भूमिका बजावण्यास सज्ज आहे, असा विश्वास वित्त राज्यमंत्री ॲड. आशिष जयस्वाल यांनी व्यक्त केला.

भारत-रशिया व्यापारी सहकार्य वाढविण्यासाठी मुंबई येथील एमव्हीआयआरडीसी वर्ल्ड ट्रेड सेंटर येथे दोन दिवसीय कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. या कार्यक्रमाच्या उदघाट्न सत्रात ते बोलत होते.

औद्योगिक उपाय आणि शाश्वत विकास तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात भारत-रशिया सहकार्य वाढविण्यासाठी व्यापार शिष्टमंडळाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. पहिल्या दिवशी या कार्यक्रमाच्या उदघाटन सत्रामध्ये वर्ल्ड ट्रेड सेंटर आणि अखिल भारतीय उद्योग संघटनेचे अध्यक्ष डॉ. विजय कलंत्री, भारतातील रशियन निर्यात केंद्राच्या प्रतिनिधी कार्यालयाचे प्रमुख मॅमेड अखमेदोव्ह, मुंबईतील रशियन फेडरेशनचे कॉन्सुल जनरल इव्हान वाय. फेटिसोव्ह, भारतातील रशियन फेडरेशनचे व्यापार प्रतिनिधी आंद्रे ओ. सोबोलेव्ह आदी मान्यवरांनी मार्गदर्शन केले.

तत्पूर्वी, प्रमुख अतिथी म्हणून बोलतांना मंत्री ॲड. जयस्वाल म्हणाले, औद्योगिक वाढ गतिमान करणे, जागतिक दर्जाच्या पायाभूत सुविधा निर्माण करणे, नावीन्यपूर्ण तंत्रज्ञानास प्रोत्साहन देणे, जागतिक स्पर्धात्मक व्यवस्थापन यंत्रणा निर्माण करणे आणि भविष्यासाठी कौशल्य संपन्न कार्यबल तयार करणे, हे महाराष्ट्राच्या विकासाचे पाच प्रमुख स्तंभ आहेत. महाराष्ट्राला जगातील सर्वात गतिमान आणि जागतिक स्तरावर स्पर्धात्मक प्रदेश म्हणून स्थापित करण्याचे शासनाचे ध्येय आहे. या दृष्टीकोनाच्या केंद्रस्थानी व्यवसाय करण्याची सुलभता, जलद निर्णय प्रक्रिया आणि पारदर्शक शासन व्यवस्था आहे.

मंत्री ॲड. जयस्वाल म्हणाले, प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या दूरदर्शी नेतृत्वाखाली आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मार्गदर्शनाखाली विकसित भारत व्हिजन २०४७ च्या दिशेने महाराष्ट्र वाटचाल करत आहे. रशियन कंपन्यांसाठी महाराष्ट्रात तंत्रज्ञान पार्क आणि औद्योगिक क्लस्टर संयुक्तपणे विकसित करण्यास वाव आहे. विदर्भ, विशेषतः गडचिरोली, नागपूर यासारखा भाग हा खनिज संसाधने आणि सुधारित कनेक्टिव्हिटीसह नवीन विकासाचे इंजिन म्हणून उदयास येत आहे. महाराष्ट्र हरित ऊर्जा, हायड्रोजन आणि स्वच्छ तंत्रज्ञानावर लक्ष केंद्रित करत आहे. महाराष्ट्र सज्ज आहे, खुले आहे आणि तुमचा विश्वासू भागीदार आहे. आत्मविश्वासाने, सहकार्याने आणि समृद्धीच्या सामायिक दृष्टीकोनासह एकत्र पुढे जाऊ या, असे आवाहन करतांना मंत्री ॲड. जयस्वाल यांनी आघाडीच्या रशियन कंपन्यांना महाराष्ट्रात सहभाग वाढवण्यासाठी आमंत्रित केले.

व्यापारी बैठकांचे आयोजन 

पहिल्या दिवशी विविध व्यावसायिक सत्रे, भारत आणि रशियन उद्योग प्रतिनिधींमधील संवाद, तसेच संभाव्य व्यापार आणि गुंतवणूक संधींवर चर्चा झाली. उद्योग, निर्यात, तंत्रज्ञान आणि गुंतवणूक क्षेत्रातील प्रतिनिधींनी यावेळी उत्साहपूर्ण सहभाग नोंदविला. या बैठकांमधून भारतीय आणि रशियन कंपन्यांमध्ये औद्योगिक उपाय आणि शाश्वत विकास तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात भविष्यातील सहकार्याच्या संधी तपासण्यात आल्या. या बिझनेस मिशनअंतर्गत गुरुवारी बी-टू-बी बैठकांबरोबरच विविध क्षेत्रांतील सहकार्याच्या संधींवर सविस्तर चर्चा होणार आहे.

००००

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *