भारतीय सांगितीक संस्कृतीचा एक अमूल्य वारसा काळाच्या पडद्याआड – पर्यटन मंत्री शंभूराज देसाई

मुंबई, दि. 12 : भारतीय संगीतसृष्टीला आपल्या असामान्य आणि जादुई आवाजाने सुवर्णकाळ बहाल करणाऱ्या ज्येष्ठ गायिका पद्मविभूषण, महाराष्ट्र भूषण आशा भोसले यांच्या निधनाने स्वरविश्वातील एक तेजस्वी पर्व संपुष्टात आले आहे. “अभी ना जाओ छोडके” असे गीत गाणाऱ्या आशाताई सांगितीक विश्वाला आज स्वतःच पोरंक करुन गेल्या. त्यांच्या जाण्याने केवळ एक महान गायिका हरपली नाही, तर सुरांच्या अजरामर विश्वाला स्वरमय करणाऱ्या युगप्रवर्तक गायिकेकडून मिळालेला भारतीय सांगितीक संस्कृतीचा एक अमूल्य वारसा काळाच्या पडद्याआड गेला आहे, अशा शब्दांत मंत्री शंभूराज देसाई यांनी आपल्या तीव्र शोक संवेदना व्यक्त केल्या आहेत.

आपल्या शोकसंदेशात मंत्री देसाई म्हणतात की, आशाताई भोसले यांचा आवाज म्हणजे भावनांचा अथांग सागर होता. प्रत्येक गीतामधून त्यांनी आनंद, वेदना, प्रेम आणि जीवनाचे अनेक पैलू जिवंत केले. हिंदी, मराठीसह विविध भाषांमधील त्यांच्या हजारो गीतांनी अनेक पिढ्यांच्या मनावर अधिराज्य गाजवले. त्यांची गायीकी ही केवळ कला नव्हती, तर ती एक अनुभूती होती, जी प्रत्येक श्रोत्याच्या मनात कायमची घर करून राहिली आहे.

आशाताई भोसले यांचा संगीतप्रवास हा संघर्ष, जिद्द आणि कलेवरील अखंड निष्ठेचा प्रेरणादायी आदर्श आहे. काळानुसार स्वतःला सतत नव्याने घडवत त्यांनी आधुनिकता आणि परंपरा यांचा अद्भुत संगम साकारला. त्यांच्या स्वरांनी भारतीय संगीताला जागतिक स्तरावर नवी ओळख मिळवून दिली. त्यातूनच अनेक राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय पुरस्कारांवर आपली मोहोर उमटवलेला स्वर अखेर पंचतत्वात विलीन झाला.

आशाताई यांच्या निधनाने निर्माण झालेली पोकळी कधीही भरून न निघणारी आहे. त्यांचे अजरामर स्वरच त्यांच्या महान व्यक्तिमत्त्वाची साक्ष देत राहतील. आशाताई भोसले यांच्या कुटुंबीयांना तसेच असंख्य चाहत्यांना या दुःखातून सावरण्याची शक्ती मिळावी, हीच विनम्र प्रार्थना, अशा शब्दांत मंत्री शंभूराज देसाई यांनी त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली आहे.

ooooo

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *