बोरिवलीतील ‘बीएसएनएल’ व ‘एमटीएनएल’ची आरक्षित जागा ‘पीएम आवास’ योजनेसाठी घेण्यास मान्यता – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

मुंबई, दि. १० : प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत परवडणारी घरे बांधण्यासाठी बोरिवली येथील भारत संचार निगम लि. (बीएसएनएल) व महानगर टेलिफोन निगम (एमटीएनएल) यांच्या मालकीची आरक्षित जागा रेडीरेकनर दरानुसार घेण्यास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मान्यता दिली.

महाराष्ट्र गृहनिर्माण विकास महामंडळाची बैठक मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली सह्याद्री अतिथीगृहात झाली. यावेळी गृहनिर्माण विभागाचे अपर मुख्य सचिव असीमकुमार गुप्ता, मित्राचे मुख्य कार्यकारी अधिकारी प्रवीण परदेशी, महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक तथा मुख्य कार्यकारी अधिकारी त्र्यंबक कासार, संचालक (प्रशासन) प्रवीण कोळी, तांत्रिक संचालक अभिजित लोंढे, सहायक अधिकारी शिरतेज रसाळ आदी यावेळी उपस्थित होते.

बोरिवली येथील गोराई येथे भारत संचार निगम लिमिटेड यांच्या मालकीची तर शिंपाली येथे महानगर टेलिफोन निगमची जागा असून दोन्हींची मिळून एकूण २८.८४ एकर जागा आरक्षित आहे. ही आरक्षित जागा रेडिरेकनर दरानुसार ७२९ कोटी रुपयांना घेऊन या आरक्षित जागेवर प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत घरांचा प्रकल्प राबविण्यास तसेच उर्वरित आरक्षित जागा विकसित करण्याचा प्रस्ताव महामंडळाने बैठकीत ठेवला होता. या प्रस्तावास मुख्यमंत्री फडणवीस यांनी मान्यता दिली. या जागेवर सुमारे एक हजाराहून अधिक घरे बांधण्याचा प्रस्ताव असल्याचे श्री. कासार यांनी यावेळी सांगितले.

००००

नंदकुमार वाघमारे/विसंअ

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *