आपला कुंभ, आपली जबाबदारी’ पुस्तिका जनजागृतीसाठी उपयुक्त ठरणार –    कुंभमेळा मंत्री गिरीश महाजन

नाशिक, दि.१९ जुलै (जिमाका वृत्तसेवा) : सिंहस्थ कुंभमेळ्याला शेकडो वर्षांची परंपरा आहे. ही परंपरा नाशिककरांसह सर्वांपर्यंत पोहोचावी यासाठी सिंहस्थ सहायक समितीने प्रकाशित केलेली ‘आपला कुंभ,  आपली जबाबदारी’ ही पुस्तिका उपयुक्त ठरेल, असे प्रतिपादन राज्याचे जलसंपदा (विदर्भ, तापी व कोकण पाटबंधारे विकास महामंडळ), आपत्ती व्यवस्थापन, तथा कुंभमेळा मंत्री गिरीश महाजन यांनी केले.

नाशिक-त्र्यंबकेश्वर सिंहस्थ कुंभमेळा प्राधिकरणाची बैठक रविवारी कुंभमेळा मंत्री गिरीश महाजन यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित करण्यात आली होती. या बैठकीपूर्वी छोटेखानी समारंभात ‘सिंहस्थ कुंभ पर्व: सोहळा जनजागरणाचा, भावजागराणाचा जनसहभागाचा’ या पुस्तिकेचे प्रकाशन करण्यात आले. महापौर हिमगौरी आडके-आहेर, प्राधिकरणाचे अध्यक्ष तथा विभागीय आयुक्त डॉ. प्रवीण गेडाम, पोलीस आयुक्त डाॅ. संदीप कर्णिक, कुंभमेळा आयुक्त शेखर सिंह, महापालिका आयुक्त मनीषा खत्री, जिल्हाधिकारी आयुष प्रसाद, पोलीस अधीक्षक डाॅ. डी. एस. स्वामी, स्थायी समिती सभापती मच्छिंद्र सानप, सिंहस्थ सहायक समितीचे गिरीश सातपुते आदींची यावेळी उपस्थिती होती.

‘आपला कुंभ, आपली जबाबदारी’ या भावनेने आधारित ‘सोहळा जनजागरणाचा, भावजागराणाचा जनसहभागाचा’ या पुस्तिकेचे प्रकाशन मंत्री श्री. महाजन यांच्या हस्ते झाले. यावेळी आनंदवल्ली येथील महापालिका शाळा क्र.१८ येथील विद्यार्थ्यांना प्रातिनिधिक स्वरूपात पुस्तिकेचे वितरण करण्यात आले. विजय वैश्यपायन यांनी सादरीकरणाद्वारे या पुस्तिकेत समाविष्ट कुंभपर्व विषयक माहिती दिली. यावेळी पुस्तिका निर्मितीसाठी सहाय्य करणाऱ्या कलाकार, लेखकांचा सत्कार करण्यात आला.

प्रकाशनापूर्वी सिंहस्थ सहायक समितीचे गिरीश सातपुते यांच्या हस्ते मंत्री महोदयांचा सत्कार करण्यात आला.

सिंहस्थ कुंभमेळ्याच्या अनुषंगाने आकाशवाणी नाशिक केंद्रावरून ७२ भागांची ‘सोहळा कुंभ पर्वाचा’ ही रेडिओ मालिका सोमवार दिनांक २० जुलै पासून प्रसारित होणार आहे.

यावेळी सुरुवातीला बैठकीपूर्वी कुंभमेळा प्राधिकरणाच्या कार्यालयातील सभागृह   नूतनीकरणाचे उद्घाटन मंत्री श्री. महाजन यांच्या हस्ते करण्यात आले. या निर्मितीसाठी सहकार्य करणाऱ्या अभियंत्यांचा सत्कार यावेळी मंत्रीमहोदयांच्या हस्ते करण्यात आला.

0000

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *