बीड जिल्ह्यातील सामाजिक समस्या सोडविण्यासाठी स्वतः पुढाकार घेणार – उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार

बीड, दि. १५: बीड जिल्ह्यातील वेठबिगारी, बालमजुरी, बालविवाह, स्त्री भ्रूणहत्या आणि व्यसनाधीनता यांसारख्या गंभीर सामाजिक समस्यांचे निर्मूलन करण्यासाठी आपण स्वतः पुढाकार घेणार असून, जिल्हा प्रशासन, पोलीस प्रशासन आणि जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाने समन्वयाने काम करावे, असे निर्देश उपमुख्यमंत्री तथा बीड जिल्ह्याच्या पालकमंत्री सुनेत्रा अजित पवार यांनी दिले.

जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, बीड, इंटरनॅशनल जस्टिस मिशन, जिल्हा प्रशासन, जिल्हा वकील संघ आणि जिल्हा पोलीस दल यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित ‘वॉकेथॉन २०२६’ चा शुभारंभ उपमुख्यमंत्री तथा पालकमंत्री सुनेत्रा अजित पवार यांच्या हस्ते आज सकाळी झाला. यावेळी त्या बोलत होत्या.

उपमुख्यमंत्री श्रीमती पवार म्हणाल्या, बीड जिल्ह्यातील बालमजुरी, वेठबिगारी, बालविवाह, स्त्री भ्रूणहत्या आणि व्यसनाधीनता यांसारख्या सामाजिक समस्यांना आळा घालण्यासाठी मी स्वतः पुढाकार घेईन. या कार्यात जिल्हा प्रशासन पूर्ण ताकदीने जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाच्या सोबत राहून काम करेल. समाजातील या समस्या दूर करण्यासाठी केवळ कायदे पुरेसे नसून जनजागृती आणि लोकसहभागही तितकाच महत्त्वाचा असल्याचे त्यांनी सांगितले.

उपमुख्यमंत्री पवार यांनी वॉकेथॉनमध्ये सहभागी झालेल्या विद्यार्थी-विद्यार्थिनींशी संवाद साधत चांगले शिक्षण घेऊन सक्षम नागरिक बनावे आणि समाजाच्या जडणघडणीत सकारात्मक योगदान द्यावे, असे आवाहन केले.

११८ वेठबिगारांची सुटका; ६० बालविवाह रोखले

जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे अध्यक्ष दिनेश पी. सुराणा यांनी बीड जिल्ह्यातील सामाजिक समस्यांवर सुरू असलेल्या कामाची माहिती दिली. जिल्ह्यात आतापर्यंत ११८ वेठबिगारांची सुटका करण्यात आली असून, त्यांच्या पुनर्वसनाचे काम सुरू असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच गेल्या वर्षभरात सुमारे ६० बालविवाह रोखण्यात आले असून, संबंधित बालिकांना पुन्हा शिक्षणाच्या प्रवाहात आणण्यासाठी प्रयत्न सुरू असल्याचे त्यांनी नमूद केले.

जनजागृतीसाठी वॉकेथॉन; स्त्री भ्रूणहत्येविरोधात नाटिका

उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या हस्ते हिरवा झेंडा दाखवून वॉकेथॉनला सुरुवात करण्यात आली. वॉकेथॉन शिवाजी महाराज पुतळा, अण्णाभाऊ साठे चौकमार्गे जिल्हा न्यायालय येथे परत आली.

यानंतर नर्सिंग महाविद्यालयाच्या विद्यार्थिनींनी स्त्री भ्रूणहत्येविरोधात जनजागृती करणाऱ्या नाटिकेचे सादरीकरण केले.

या कार्यक्रमास जिल्हाधिकारी विवेक जॉन्सन, पोलीस अधीक्षक नवनीत कॉवन, मुख्य कार्यकारी अधिकारी जितीन रहमान, जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे अध्यक्ष दिनेश पी. सुराणा, जिल्हा वकील संघाचे अध्यक्ष बी. एस. बोडखे,
बीड मुख्यालयातील न्यायाधीश, जिल्हा वकील संघाचे पदाधिकारी, विधिज्ञ, न्यायालयीन कर्मचारी तसेच शाळा-महाविद्यालयातील विद्यार्थी-विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विधीदूत तत्वशिल कांबळे यांनी केले.

००००

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *