मुंबई, दि. १३ : महाराष्ट्रात मोठ्या उत्साहात साजरा होणाऱ्या सार्वजनिक गणेशोत्सवाच्या माध्यमातून बाल हक्क, बाल संरक्षण तसेच बालकांशी संबंधित कायदे व यंत्रणांबाबत व्यापक जनजागृती करण्याचे आवाहन महाराष्ट्र राज्य बाल हक्क संरक्षण आयोगाने गणेशोत्सव मंडळांना केले आहे.
बालकांना शिक्षण, सुरक्षितता, सन्मानाने जगणे आणि शोषणापासून संरक्षणाचा हक्क आहे. बाल लैंगिक अत्याचारांपासून संरक्षण अधिनियम, बालविवाह प्रतिबंधक कायदा, बालमजुरी, बाल तस्करी तसेच बालकांवरील अत्याचार व शोषण याबाबत नागरिकांमध्ये जागरूकता निर्माण करण्यासाठी गणेशोत्सव मंडळांनी पुढाकार घ्यावा, असे आयोगाने प्रसिद्धिपत्रकाद्वारे म्हटले आहे.
गणेशोत्सव मंडळांनी मंडप परिसरात बाल हक्क व बाल संरक्षण विषयक फलक, पोस्टर्स, बॅनर्स, एलईडी संदेश तसेच माहितीपत्रके लावावीत व वितरित करावीत. बालकांशी संबंधित कोणतीही अनुचित घटना निदर्शनास आल्यास संबंधित यंत्रणेशी तातडीने संपर्क साधण्याबाबत नागरिकांना माहिती द्यावी.या जनजागृती उपक्रमांतर्गत बाल कल्याण समिती, जिल्हा बाल संरक्षण कक्ष, विशेष बाल पोलीस पथक, बाल हेल्पलाइन, बाल संरक्षण सेवा तसेच महाराष्ट्र राज्य बाल हक्क संरक्षण आयोगाच्या ‘चिराग’ ॲप आणि तक्रार निवारण व्यवस्थेबाबतची माहिती नागरिकांपर्यंत पोहोचविण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
गणेशोत्सव काळात बालकांचा सक्रिय सहभाग वाढविण्यासाठी निबंध लेखन, चित्रकला, पोस्टर मेकिंग, घोषवाक्य लेखन, वक्तृत्व तसेच बाल हक्क विषयक जनजागृतीपर उपक्रम आयोजित करण्याचे आवाहनही गणेशोत्सव मंडळांना करण्यात आले आहे.गणेशोत्सव हा केवळ धार्मिक व सांस्कृतिक उत्सव न राहता बालकांच्या सुरक्षिततेचा, त्यांच्या हक्कांचा आणि जबाबदार समाजनिर्मितीचा संदेश देणारा लोकउत्सव ठरावा, हा या उपक्रमामागील उद्देश आहे.
0000
श्रद्धा मेश्राम/विसंअ