मुंबई, दि. १३ : अवयवदान आणि प्रत्यारोपण प्रक्रियेतील किचकटपणा दूर करून ‘रोटो-सोटो’चे (‘रिजनल ऑर्गन अँड टिश्यू ट्रान्स्प्लान्ट ऑर्गनायझेशन’ व ‘स्टेट ऑर्गन अँड टिश्यू ट्रान्स्प्लान्ट ऑर्गनायझेशन’) काम अधिक गतिमान करावे. नोंदणी प्रक्रिया वाढवावी, शासन यासाठी सर्वतोपरी मदत करेल. यासाठी प्रस्तावित चार केंद्रांचे काम पुढील महिनाभरात मार्गी लावावे, असे निर्देश सार्वजनिक आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर यांनी दिले. अवयवदानाबाबतची भीती व निरुत्साह दूर करण्यासाठी रुग्णालयांनी पुढाकार घ्यावा आणि जनजागृती अभियान राबवावे, असे आवाहनही त्यांनी केले.
यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान येथे सार्वजनिक आरोग्य विभाग, महात्मा ज्योतिराव फुले जनआरोग्य योजना आणि आयुष्मान भारततर्फे अवयवदान दिनानिमित्त आयोजित जनजागृती आणि रुग्णालयांशी संवाद कार्यक्रमात आरोग्यमंत्री आबिटकर बोलत होते.
अवयव प्रत्यारोपणासाठी पुणे किंवा मुंबई येथे यावे लागू नये, यासाठी कोल्हापूर, अमरावतीसारख्या ठिकाणी केंद्रे सुरू झाल्यास नागरिक, गरजू रुग्णांना मोठा लाभ होईल. प्रस्तावित चार केंद्रांची कार्यवाही जलदगतीने पूर्ण करावी. अवयवदान व प्रत्यारोपण प्रक्रियेबाबत जस्टिस शिंदे यांच्या अध्यक्षतेखालील अहवालातील सूचनांवर पुढील आठवड्यात बैठक घेऊन कार्यवाही करावी, असे सार्वजनिक आरोग्यमंत्री आबिटकर यांनी सांगितले.
सार्वजनिक आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर म्हणाले, अवयव प्रत्यारोपणासाठी आवश्यक निधीची अडचण सार्वजनिक आरोग्य विभागाने सोडविली आहे. महात्मा ज्योतिराव फुले जनआरोग्य योजनेच्या माध्यमातून तामिळनाडूच्या धर्तीवर कॉर्पस फंडाची निर्मिती करण्यात आली असून, त्याचा लाभ गरजू रुग्णांना होत आहे. खासगी रुग्णालयांनीही या उपक्रमात सहभागी होऊन जास्तीत जास्त रुग्णांना सेवा द्यावी. योजनेच्या पॅकेजव्यतिरिक्त रुग्णांकडून एकही रुपया आकारला जाऊ नये, असेही त्यांनी स्पष्ट केले.
अवयवदानाची इच्छा व्यक्त करणारे एक लाखांहून अधिक अर्ज भरून महाराष्ट्राने आघाडी घेतली आहे. अवयवदान केलेल्या व्यक्तींच्या कुटुंबीयांचा सन्मान करून सकारात्मक वातावरण निर्माण करण्याचा प्रयत्न करण्यात आला. अवयवदानाच्या वेळी संबंधित यंत्रणांनी संवेदनशीलता आणि सकारात्मक दृष्टिकोन ठेवून तत्काळ मदत करणे आवश्यक असल्याचे सार्वजनिक आरोग्यमंत्री आबिटकर यांनी नमूद केले.
चुकीच्या गोष्टींना प्रतिबंध करतानाच चांगल्या कामाला गती देणे गरजेचे आहे. अवयवांच्या प्रतीक्षेत असलेल्या रुग्णांसाठी खासगी रुग्णालयांनी सामाजिक जाणीवेतून काम करावे आणि हब-अँड-स्पोक मॉडेलमधील रुग्णालयांत जनजागृती अभियान राबवावे, असे आवाहन त्यांनी केले.
प्रत्येकाने सामाजिक कामातून आनंद घ्यावा- ओमप्रकाश शेटे
समाजात अनेक गरीब रुग्ण आहेत. त्यांना शासन आणि सामाजिक संघटना, खासगी रुग्णालयांनी मदत केली तर त्यांचे जीवन सुधारू शकते. त्यांचा जीव वाचू शकतो, यामुळे प्रत्येकाने सामाजिक कामातून आनंद घेण्याचा प्रयत्न करावा, असे आवाहन आयुष्मान भारत मिशन महाराष्ट्र समितीचे अध्यक्ष ओमप्रकाश शेटे यांनी केले. सध्या कुबेराच्या संपत्तीपेक्षा गरीब रुग्णांच्या आणि त्यांच्या नातेवाईकांच्या प्रतिक्रिया महत्वाच्या आहेत. यामुळे विविध माध्यमातून त्यांना मदत करा, अवयवदान आणि प्रत्यारोपण यासाठी शासनासोबत संस्था, खासगी रुग्णालये यांनी पुढाकार घेण्याचेही त्यांनी आवाहन केले.
सार्वजनिक आरोग्य विभागाचे सचिव ई. रविन्द्रन यांनी अवयवदानाबाबत नागरिकांमध्ये जागृती निर्माण होण्याची अपेक्षा व्यक्त केली. महाविद्यालये आणि इतर ठिकाणी अवयवदानाचे कॅम्प व्हावेत, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.
आयुक्त (आरोग्य सेवा) संजय काटकर, शहरी आरोग्य आयुक्त डॉ. सुनील भोकरे, ईएसआयएसचे आयुक्त रमेश चव्हाण, राज्य आरोग्य हमी सोसायटीचे मुख्य कार्यकारी अधिकारी अण्णासाहेब चव्हाण आदींसह मुंबईतील खासगी रुग्णालयाचे प्रतिनिधी उपस्थित होते.
माजी संचालक प्रवीण शिंगारे यांनी अवयवदानाबाबतच्या कायद्याची माहिती दिली तर प्रास्ताविक अण्णासाहेब चव्हाण यांनी केले. प्रातिनिधिक स्वरूपात दोन रुग्णांच्या नातेवाईकांनी प्रत्यारोपण आणि शासकीय मदतीबाबत शासनाचे आभार मानले.
0000
धोंडीराम अर्जुन/विसंअ