प्रधानमंत्री आवास योजनेतील घरकुलांना निधी कमी पडू देणार नाही- ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे

मुंबई दि.२६ : प्रधानमंत्री आवास योजना महत्त्वकांक्षी योजना आहे. या योजनेच्या माध्यमातून ग्रामीण भागातील लोकांचे घरकुलांचे स्वप्न साकार होणार आहे. या योजनेतून बांधण्यात येणाऱ्या घरकुलांना  निधीची कमतरता पडू देणार नाही, असे  ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांनी विधानसभेत प्रश्नोत्तराच्या तासावेळी सांगितले.

या संदर्भात सदस्य गजानन लवटे यांनी प्रश्न उपस्थित केला होता. या प्रश्नाचे चर्चेत समीर कुणावार, सत्यजित देशमुख सुलभा खोडके यांनी उपप्रश्न विचारून सहभाग घेतला.

ग्रामविकास मंत्री गोरे यांनी या प्रश्नाच्या उत्तरात अधिक माहिती देताना सांगितले, या योजनेतून घरकुलांना मंजुरी मिळाल्यानंतर ३० दिवसांत पहिला हप्ता लाभार्थ्यांना देण्यात येत आहे. यामध्ये विलंब झाल्यास संबधित अधिकाऱ्यांवर कारवाई केली जाईल.

प्रधानमंत्री आवास योजनेतील घरकुलांची प्रतीक्षायादी कमी होत आहे. प्रतीक्षा यादी व उर्वरित लाभार्थ्यांसाठी नवीन सर्वेक्षण करण्यात येणार आहे. या योजनांतून केंद्र सरकारच्या ऑनलाइन प्रक्रियेद्वारे लाभार्थ्यांची निवड केली जात असल्याचेही ग्रामविकास मंत्री श्री. गोरे यांनी सांगितले.

अमरावती जिल्ह्यात प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत ५४८९८ घरकुलांची मागणी होती, त्यापैकी ५०९९७ घरकुलांना मंजुरी देण्यात आल्याचेही त्यांनी सांगितले. घरकुल योजनेतील लाभार्थीला हप्ते मिळवणे व अन्य कामासाठी कोणतीही अडचण येणार नाही. त्याबाबत कोणतीही तक्रार आल्यास संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाई करण्यात येईल, असेही ग्रामविकास मंत्री श्री. गोरे यांनी सांगितले.

०००००

एकनाथ पोवार/विसंअ/

 

चंद्रपूर जिल्ह्यातील ब्रम्हपुरी येथे महिला व बाल रुग्णालय मंजूर करण्याबाबत लवकरच निर्णय– सार्वजनिक आरोग्य मंत्री प्रकाश आबिटकर

मुंबई, दि. २६ : चंद्रपूर जिल्ह्यातील ब्रम्हपुरी येथे नवीन महिला व बाल रुग्णालय धोरणानुसार प्रस्तावित आहे. हे रुग्णालय मंजूर करण्याबाबत लवकरच निर्णय घेण्यात येईल असे सार्वजनिक आरोग्य मंत्री प्रकाश आबिटकर यांनी विधानसभेत प्रश्नोत्तराच्या तासात सांगितले.

याबाबत सदस्य समीर कुणावार यांनी प्रश्न उपस्थित केला. यावेळी योगेश सागर, विक्रम पाचपुते, बाळा नर यांनी उपप्रश्न उपस्थित केला.

सार्वजनिक आरोग्य मंत्री आबिटकर म्हणाले, अहिल्यानगर जिल्ह्यासाठी प्रस्तावित बाल रुग्णालय आणि श्रीगोंदा शहरात 100 खाटांचे रुग्णालय यासंदर्भात आराखडा तयार करण्यात आला असून, हा विषय प्राधान्याने सोडविण्यात येणार आहे. राज्यातील प्रस्तावित रुग्णालयाबाबत लवकरच बैठक घेण्यात येईल.

००००

शैलजा पाटील/विसंअ/

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *