पेलिकन पार्क येथे स्वर्गीय अजितदादा पवार यांचे भव्य स्मारक उभारणार – मंत्री छगन भुजबळ

नाशिक, दि. २२ : नाशिक शहरातील पेलिकन पार्क येथे माजी उपमुख्यमंत्री स्वर्गीय अजितदादा पवार यांच्या विकासाभिमुख कार्याचा वारसा जपण्यासाठी त्यांचे भव्य स्मारक उभारण्यात येईल, असे प्रतिपादन राज्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांनी केले.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त तसेच स्वर्गीय अजितदादा पवार यांच्या जयंतीनिमित्त पेलिकन पार्क येथे आयोजित कार्यक्रमात अपंगांना सहाय्यक साहित्य वाटप, ज्येष्ठ नागरिकांना छत्री वाटप तसेच रक्तदान शिबिराचा शुभारंभ मंत्री भुजबळ यांच्या हस्ते झाला. त्यावेळी ते बोलत होते.

यावेळी आमदार पंकज भुजबळ, पोलीस आयुक्त डाॅ. संदीप कर्णिक, भगूरच्या नगराध्यक्षा प्रेरणा बलकवडे, म्हाडाचे सभापती रंजन ठाकरे, नगरसेवक तथा स्थायी समिती सदस्य मुकेश शहाणे, भगवान दोंदे, भूषण राणे, नगरसेविका योगिता हिरे, माधुरी ढेमसे, नानासाहेब महाले, माजी नगरसेविका प्रतिभा पवार यांच्यासह शालेय विद्यार्थी, ज्येष्ठ नागरिक व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

यावेळी मंत्री भुजबळ म्हणाले, स्वर्गीय अजितदादा पवार यांनी शहर आणि ग्रामीण भाग व राज्याच्या सर्वांगीण विकासासाठी दूरदृष्टीने काम केले. विकास हा लोककेंद्रित असावा, हा त्यांचा दृष्टिकोन होता. त्यांचे नेतृत्व, विकासाभिमुख दृष्टीकोन आणि लोकहितासाठीची बांधिलकी यामुळे त्यांनी समाजजीवनावर अमिट ठसा उमटविला असून, त्यांनी केलेल्या विकासकामांची प्रेरणा पुढील पिढ्यांना कायम मार्गदर्शक ठरेल. प्रत्येकाने आपल्या गावाच्या, शहराच्या आणि समाजाच्या विकासासाठी योगदान दिल्यास राज्याच्या प्रगतीला अधिक गती मिळेल. त्यांच्या कार्याची कायमस्वरूपी आठवण राहावी आणि भावी पिढ्यांना त्यांच्या विचारांतून प्रेरणा मिळावी, यासाठी पेलिकन पार्क येथे त्यांचे भव्य स्मारक उभारण्यात येईल. समाजोपयोगी उपक्रमांमधून गरजू घटकांपर्यंत मदतीचा हात पोहोचविणे हीच दादांना खरी आदरांजली असल्याचे मंत्री भुजबळ यांनी सांगितले.

पोलीस आयुक्त संदीप कर्णिक म्हणाले, पोलीस विभागातील कारकिर्दीच्या सुरुवातीच्या काळात स्वर्गीय अजितदादा पवार यांच्यासोबत काम करण्याची संधी लाभली. त्यांच्या कार्यपद्धतीत शिस्त, कामावरील निष्ठा आणि कठोर परिश्रमाला सर्वोच्च प्राधान्य होते. सार्वजनिक जीवनातील सर्वोच्च जबाबदाऱ्या सांभाळतानाही त्यांनी विकासकामांसाठी अविरत परिश्रम घेतले. सकाळपासून रात्री उशिरापर्यंत लोकहिताची कामे करण्याची त्यांची कार्यतत्परता प्रत्येकासाठी प्रेरणादायी होती. सहकाऱ्यांशी त्यांनी नेहमीच आपुलकीची वागणूक दिली, अशी भावना त्यांनी व्यक्त केली.

मंत्री भुजबळ यांच्या हस्ते झाले वृक्षारोपण

यानंतर छत्रपती संभाजीनगर रोड, नाशिक येथे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त तसेच माजी उपमुख्यमंत्री स्वर्गीय अजितदादा पवार यांच्या जयंतीनिमित्त वृक्षारोपण अभियान उत्साहात संपन्न झाले. यावेळी महाराष्ट्र गृहनिर्माण व क्षेत्र विकास मंडळ, नाशिकमार्फत दहा हजार वृक्ष लागवडीचा शुभारंभ उपस्थितीत करण्यात आला. यावेळी म्हाडाचे सभापती रंजन ठाकरे, उपाध्यक्ष संजीव जैसवाल, मुख्य कार्यकारी अधिकारी शिवकुमार आवळकंठे यांच्यासह नागरिक व विद्यार्थी उपस्थित होते.

पर्यावरण संरक्षणासाठी वृक्षारोपणासोबतच त्यांचे संवर्धन करणे ही प्रत्येकाची सामूहिक जबाबदारी असून, हरित नाशिक घडविण्यासाठी नागरिकांनी अशा उपक्रमात सक्रिय सहभाग घ्यावा, असे आवाहन मंत्री छगन भुजबळ यांनी यावेळी केले.

००००

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *