पेंच जलाशयातील पिंजरा मत्स्यपालन प्रकल्पधारकांच्या नुकसान भरपाईबाबत प्रस्ताव सादर करावे – राज्यमंत्री ॲड.आशिष जयस्वाल

मुंबई, दि. १०: पेंच जलाशयातील पिंजरा मत्स्यपालन प्रकल्पधारकांना अतिवृष्टीमुळे मोठे आर्थिक नुकसान झाले असून तातडीने प्रस्ताव सादर करण्याचे निर्देश मदत व पुनर्वसन राज्यमंत्री ॲड. आशिष जयस्वाल यांनी दिले. राज्यमंत्री ॲड. जयस्वाल यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयात आयोजित आढावा बैठकीत ते बोलत होते..

राज्यमंत्री ॲड. जयस्वाल यांनी मत्स्योद्योग विभागाच्या अधिकाऱ्यांना सदर नुकसान भरपाईचा सुधारित प्रस्ताव  मुख्यमंत्री आणि जिल्हा नियोजन समितीकडे  सादर करण्याच्या सूचना केल्या.

जे २४ पिंजरे वाहून गेले आहेत, ते पुन्हा कार्यान्वित करण्यासंदर्भात सकारात्मक धोरण अवलंबण्याचे निर्देश देण्यात आले. मदत व पुनर्वसन विभाग आणि मत्स्यव्यवसाय विभागाने समन्वय साधून लाभार्थ्यांना तातडीने आर्थिक मदत मिळवून देण्यासाठी कार्यवाही करावी, असेही निर्देश यावेळी त्यांनी दिले.

​​या बैठकीस महाराष्ट्र मत्स्योद्योग महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक प्रकाश खपले, मत्स्यव्यवसाय विभागाच्या सहआयुक्त श्रीमती दीक्षित, मदत व पुनर्वसन विभागाचे अवर सचिव सुनील सामंत आणि संबंधित विभागांचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

०००

राजू धोत्रे/विसंअ

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *