पावसाळ्यात साकव दुरुस्तीअभावी गावाचा संपर्क तुटता कामा नये – ग्रामविकास व पंचायतराज राज्यमंत्री योगेश कदम

मुंबई, दि. 5 : कोकणात पाऊस मोठ्या प्रमाणावर असतो. त्यामुळे नदी – नाल्यांना पूर येऊन गावांचा संपर्क तुटतो. गावांचा संपर्क राहण्यासाठी साकवची व्यवस्था करण्यात आली आहे. पावसाळ्यात कोकणात अस्तित्वातील साकव दुरुस्त करून कुठेही साकव दुरुस्ती अभावी गावांचा संपर्क तुटता कामा नये, अशा सूचना ग्रामविकास व पंचायतराज राज्यमंत्री डॉ. योगेश कदम यांनी दिल्या.

कोकणातील साकव निर्मिती, दुरुस्ती बाबत बैठकीचे मंत्रालयात आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी आढावा घेताना राज्यमंत्री श्री. कदम बोलत होते. बैठकीस ग्रामविकास विभागाचे प्रधान सचिव एकनाथ डवले तर दूरदृष्य प्रणालीद्वारे कोकण विभागीय आयुक्त विजय सूर्यवंशी, रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्याचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी उपस्थित होते.

राज्यमंत्री योगेश कदम म्हणाले, पाणंद रस्त्याप्रमाणे साकव निर्मिती व दुरुस्तीसाठी कोकण विभागाचा आराखडा तयार करून राज्यस्तरीय नवीन लेखाशीर्ष निर्माण करावे. कोकणात आवश्यकतेनुसार नवीन साकव निर्मिती, दुरुस्तीसाठी आराखडा तयार करावा. यासाठी गावनिहाय माहिती घेण्यात यावी.

कोकणात अस्तित्वातील साकवांची उंची वाढवून पुलात रूपांतर करण्यासाठी आराखड्यात समावेश करावा. साकव दुरुस्ती आणि निर्मितीचा प्राधान्यक्रम ठरविण्यात यावा, अशा सूचनाही राज्यमंत्री श्री. कदम यांनी यावेळी दिल्या.

0000

नीलेश तायडे/विसंअ/

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *