पालकमंत्र्यांनी केली स्वत:ची स्व-गणना! जिल्ह्यात डिजीटल स्व-गणना मोहिमेचा शुभारंभ  

यवतमाळ,दि.१ (जिमाका) : जिल्ह्यात आजपासून भारताच्या १६ व्या जनगणनेच्या पहिल्या टप्प्यातील स्व-गणनेला सुरुवात झाली असून  पालकमंत्री नामदार संजय राठोड यांनी स्वत:ची स्व-गणना करुन या मोहिमेचा शुभारंभ केला.

जनगणना संचालनालय व प्रधान जनगणना अधिकारी तथा जिल्हाधिकारी कार्यालयाच्या संयुक्त विद्यमाने बचत भवन येथे शुक्रवारी आयोजित या स्वगणना मोहिमेच्या शुभारंभ प्रसंगी मुख्य कार्यकारी अधिकारी मंदार पत्की, पोलीस अधीक्षक कुमार चिंता, मुख्य वनसंरक्षक डॉ. किशोर मानकर, अतिरिक्त जिल्हाधिकारी अनिल खंडागळे, निवासी उपजिल्हाधिकारी अनिरुध्द बक्षी, उपविभागीय अधिकारी गोपाळ देशपांडे, तहसिलदार विद्या शिंदे यांच्यासह वरिष्ठ अधिकारी, कर्मचारी व नागरिक उपस्थित होते.

देशभरात जनगणनेचे कामकाज सुरू झाले असून पहिल्या टप्प्यात घरयादी व घरगणना हे कार्य डिजिटल पद्धतीने राबविण्यात येणार आहे. याअंतर्गत नागरिकांसाठी स्व-गणना (Self Enumeration) करण्याची सुविधा शासनामार्फत उपलब्ध करून देण्यात आली आहे. ही सुविधा १ मे  ते १५ मे २०२६ या कालावधीत https://se.census.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध राहणार आहे. या उपक्रमामुळे नागरिकांना स्वतःची माहिती ऑनलाइन पद्धतीने सहजपणे भरता येणार असून ही प्रक्रिया सुरक्षित, सुलभ आणि सोयीस्कर आहे. जनगणना प्रक्रियेच्या यशस्वी अंमलबजावणीसाठी नागरिकांचा सक्रिय सहभाग आवश्यक आहे.

जनगणना हे राष्ट्रहिताचे कार्य असल्याने १ मेपासून सुरू झालेल्या स्व-गणनेत जिल्ह्यातील सर्व नागरिकांनी आपली स्व-गणना पूर्ण करुन या राष्ट्रीय कार्यात सहभाग नोंदवावा, असे आवाहन पालकमंत्री ना. संजय राठोड यांनी यावेळी केले.

0000000

 

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *