मुंबई, दि. २: पारनेर विधानसभा मतदारसंघातील प्रस्तावित व प्रगतिपथावरील सिंचन प्रकल्पांची कामे वेळेत पूर्ण करून शेतकऱ्यांना लवकर सिंचनाचा लाभ मिळेल, यासाठी आवश्यक प्रशासकीय व तांत्रिक कार्यवाहीला गती द्यावी, असे निर्देश जलसंपदा (गोदावरी व कृष्णा खोरे विकास महामंडळ) मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांनी दिले.
मंत्रालयात जलसंपद मंत्री विखे-पाटील यांच्या अध्यक्षतेखाली पारनेर विधानसभा मतदारसंघातील विविध सिंचन प्रकल्पांच्या आढावा घेण्यात आला. या बैठकीस आमदार काशिनाथ दाते, जलसंपदा विभागाचे प्रधान सचिव एकनाथ डवले, सचिव जयंत बोरकर, मुख्य अभियंता संजीव चोपडे, सहसचिव सविता बोधेकर आदी उपस्थित होते.
बैठकीत कृष्णा खोरे विकास महामंडळांतर्गत पिंपळगाव जोगे डावा कालवा दुरुस्ती व नवीन अस्तरीकरणाच्या कामाच्या सद्यस्थितीचा आढावा घेऊन पुढील कार्यवाहीबाबत चर्चा करण्यात आली. तसेच पिंपळगाव जोगे डावा कालवा–शिवडोह कालवा या कामाला अधिक गती देण्याच्या सूचना देण्यात आल्या.
याशिवाय पठार भागातील फुणेवाडी, राळेगणसिद्धी आणि जाटेगाव येथील तीन उपसा सिंचन योजनांच्या प्रगतीचाही आढावा घेण्यात आला. या योजनांमधील प्रलंबित बाबी तातडीने पूर्ण करून कामे निर्धारित वेळेत पूर्ण करण्याचे निर्देश संबंधित अधिकाऱ्यांना मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांनी दिले.
०००००
एकनाथ पोवार/स.सं.