परभणी जिल्ह्यात अत्याधुनिक आरोग्य सुविधा उभारणीस गती देणार – राज्यमंत्री मेघना साकोरे-बोर्डीकर

मुंबई, दि. २४ : परभणी जिल्ह्यातील नागरिकांना दर्जेदार, गुणवत्तापूर्ण आणि अत्याधुनिक आरोग्य सेवा उपलब्ध करून देण्यासाठी आरोग्य विभागाशी संबंधित प्रस्ताव तातडीने मार्गी लावावेत तसेच सर्व कामांना गती द्यावी, असे निर्देश सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण राज्यमंत्री तथा परभणी जिल्ह्याच्या पालकमंत्री मेघना साकोरे-बोर्डीकर यांनी दिले.

परभणी जिल्ह्यातील आरोग्य विभागासंदर्भातील विविध प्रलंबित प्रस्तावांसंदर्भात आढावा बैठकीचे आयोजन एमएसआरडीसी कार्यालय, निर्मल भवन येथे करण्यात आले होते. बैठकीच्या अध्यक्षस्थानी राज्यमंत्री मेघना साकोरे-बोर्डीकर होत्या.

बैठकीत जिल्ह्यातील आरोग्य संस्थांचे श्रेणीवर्धन, ५० खाटांच्या नशामुक्ती केंद्राची उभारणी, विविध आरोग्य संस्थांमध्ये मॉड्युलर ऑपरेशन थिएटर, मॉड्युलर लेबर रूम आणि अन्य अत्याधुनिक सुविधांच्या माध्यमातून दर्जोन्नती, सेलू येथे अत्याधुनिक कॅथलॅब स्थापन करणे तसेच परभणी जिल्हा रुग्णालय, येथे रोबोटिक सर्जरी सेवा उपलब्ध करून देणे या विषयांवर सविस्तर चर्चा करण्यात आली.

राज्यमंत्री मेघना साकोरे-बोर्डीकर यांनी परभणी जिल्ह्यातील सर्व शासकीय रुग्णालये जागतिक दर्जाच्या वैद्यकीय उपकरणांनी सुसज्ज करण्यासाठी आवश्यक प्रस्ताव तातडीने सादर करण्याचे निर्देश  दिले. सोनपेठ ट्रॉमा केयर सेंटर, गंगाखेड येथील महिला रुग्णालयाच्या प्रस्तावावर देखील यावेळी सविस्तर चर्चा झाली. तसेच जिंतूर येथे १०० खाटांचे महिला रुग्णालय, सेलू येथे १०० खाटांचे सुसज्ज उपजिल्हा रुग्णालय आणि बोरी येथे ट्रॉमा केअर सेंटर उभारणीसंदर्भातील प्रस्तावांनाही गती देण्याचे निर्देश त्यांनी दिले.

परभणी येथे अत्याधुनिक रोबोटिक सर्जरी सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी परिपूर्ण प्रस्ताव तयार करून सादर करावा तसेच त्यासाठी कालबद्ध कृती आराखडा तयार करण्यात यावे, असे निर्देशही त्यांनी यावेळी दिले.

परभणी जिल्ह्यातील नागरिकांना अधिक सक्षम, सुलभ आणि गुणवत्तापूर्ण आरोग्य सेवा उपलब्ध व्हाव्यात यासाठी जिल्हा शल्यचिकित्सक, तसेच उपसंचालक यांनी प्रत्यक्ष जिल्हा भेट देऊन आरोग्य सुविधांचा आढावा घ्यावा आणि आवश्यक उपाययोजना राबवाव्यात, असे निर्देशही राज्यमंत्री मेघना साकोरे-बोर्डीकर यांनी दिले.

परभणी जिल्ह्यातील आरोग्य सुविधांचा सर्वांगीण विकास करून सर्वसामान्य नागरिकांना आधुनिक वैद्यकीय सेवा उपलब्ध करून देण्यास शासन कटिबद्ध असल्याचेही त्यांनी यावेळी नमूद केले.

बैठकीस आरोग्य सेवा आयुक्त संजय काटकर, रुग्णालये सह संचालक डॉ. सुनीता गोल्हाईत तसेच आरोग्य विभागाचे संबंधित अधिकारी उपस्थित होते.

0000

गजानन पाटील/विसंअ

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *