“न्याय देवते”चा पुतळा राज्य घटनेच्या मुल्यांचे प्रतीक – न्यायमुर्ती के. व्ही. स्वामीनाथन

नागपूर, दि.२८: मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाची ऐतिहासीक इमारत ही न्यायदानाच्या मोठ्या परंपरेची साक्षीदार असून येथे उभारण्यात आलेला ‘न्याय देवते’चा पुतळा हा न्याय, समता व बंधुत्वासह राज्य घटनेतील सर्व मुल्यांचे प्रतीक असल्याचे प्रतिपादन, सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश के. व्ही. विश्वनाथन यांनी आज येथे केले.  

नागपूर खंडपीठ आवारात न्यायाधीश के. व्ही. विश्वनाथन यांच्या हस्ते ‘न्याय देवते’च्या पुतळ्याचे अनावरण करण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते. माजी सरन्यायाधीश भूषण गवई, सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश अतुल चांदूरकर, मुंबई उच्च न्यायालयाच्या न्यायाधीश भारती डांगरे आणि मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाचे वरिष्ठ प्रशासकीय न्यायाधीश अनिल किलोर यावेळी उपस्थित होते.

न्यायाधीश के. व्ही. विश्वनाथन म्हणाले, नागपूर शहराशी विशेष स्नेह आहे. सर्वोच्च न्यायालयात रूजु झाल्यानंतर पहिल्यांदाच या शहरात आलो. यापूर्वी नागपूरातील वरिष्ठ न्यायाधीशांसोबत कार्य करण्याची संधी मिळाली. उच्च न्यायालयाच्या या ऐतिहासीक इमारतीला न्यायदानाची दीर्घ परंपरा आहे. या इमारतीत प्रवेश करताच सकारात्मक वातावरणाची प्रचिती येते. आता येथे न्यायदेवतेचा अत्यंत सुबक व प्रेरणादायी पुतळा उभारल्याने या इमारतीला वेगळा आयाम प्राप्त झाला आहे. हा पुतळा न्याय, समता, बंधुता सर्व समावेशकता आदी राज्य घटनेतील मुल्यांचे प्रतीक असून न्यायदानाच्या क्षेत्रात बरेच काही करण्यासाठी प्रेरीत करतो, असे सांगून त्यांनी शुभेच्छा दिल्या.

नागपूर खंडपीठातील अनुभव चिरस्मरणीय – न्या. भूषण गवई

एकूण कारकिर्दीत मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात कार्य करण्याचा अनुभव चिरस्मरणीय असल्याच्या भावना माजी सरन्यायाधीश भूषण गवई यांनी व्यक्त केल्या.  या शहरात स्थापन झालेले विधी विद्यापीठ हे महाराष्ट्रासाठी व देशासाठी अभिमानास्पद असल्याचे त्यांनी सांगितले. विविध आठवणी व उदाहरणांद्वारे त्यांनी न्या. विश्वनाथन आणि न्या. चांदुरकर यांच्या कार्याचा गौरव केला.

न्या. अतुल चांदुरकर यांनीही मनोगत व्यक्त केले. वरिष्ठ प्रशासकीय न्यायाधीश अनिल किलोर यांनी स्वागतपर भाषण केले. अधिवक्ता राधिका बजाज यांनी सूत्रसंचालन केले तर उच्च न्यायालयाचे निबंधक भूषण क्षीरसागर यांनी आभार मानले.

गौरव आणि गरजूंना मदत

न्यायदेवतेचा पुतळा साकार करणारे शिल्पकार मौक्तिक काटे यांचा माजी सरन्यायाधीश भूषण गवई यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. नागपूर खंडपिठाने उभारलेल्या लोककल्याण निधीतून यावेळी किडनी प्रत्यारोपन शस्त्रक्रिये पश्चात उपचार आणि डायलेसिसची आवश्यकता भासणाऱ्या एकूण 11 रूग्णांना प्रत्येकी 35 हजार रूपयांचा धनादेश तसेच 9 कर्णबधिर रूग्णांना कर्णयंत्राचे वितरण यावेळी मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.

न्याय देवतेच्या पुतळ्या विषयी

उच्च न्यायालय नागपूर खंडपीठ इमारतीच्या मध्यभागी असलेल्या सेंट्रल गार्डनच्या पूर्व दिशेला एका भिंतीस विशेष व्यवस्था करून 5 फूट लांबीचा न्याय देवतेचा पुतळा उभारण्यात आला आहे. जमिनीपासून पुतळ्याची एकूण उंची 15 फूट आहे. फायबर ग्लास (एफआरपी) पासून निर्मित या मूर्तीच्या उजव्या हातात तराजू असून तो समतेचा प्रतीक आहे तर डाव्या हातात राज्यघटनेची प्रत आहे जी कायद्याच्या राज्याचे प्रतीक आहे. न्याय, निष्पक्षता आणि कायद्याच्या राज्याचा संदेश देणारा हा पुतळा या परिसरात येणाऱ्या प्रत्येकाला प्रेरणा देत राहणार आहे.

0000

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *