निसर्गाप्रति समाजात निर्माण केलेली सजगता अजरामर

मुंबई, दि. १८:  निसर्ग प्रेमी, साहित्यिक, पक्षी शास्त्रज्ञ, वन्यजीव अभ्यासक आणि निसर्ग उपासक, निसर्गऋषी पद्मश्री मारुती चितमपल्ली यांच्या निधनाची बातमी अत्यंत दु:खद आहे. त्यांनी महाराष्ट्राचे साहित्यविश्व आणि निसर्गाप्रति समाजात निर्माण केलेली सजग भूमिका अजरामर राहील. त्यांच्या लेखणीतून उमटलेली निसर्गाची शब्दचित्रे, संस्कृतीचा अभ्यास आणि त्यांनी निसर्गविषयक जागविलेली संवेदनशीलता हे सारे आपल्या मनावर खोल प्रभाव टाकणारे आहे, त्यांचे निधन म्हणजे निसर्गाच्या एका जिवंत शब्दकोशाचा लोप होण्यासारखे आहे, अशा शब्दांत वन मंत्री गणेश नाईक यांनी त्यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त करत त्यांना श्रद्धांजली वाहिली आहे.

निसर्गविज्ञान, पक्षी निरीक्षण आणि वन्य जीवांचे गाढे अभ्यासक म्हणून ओळखले जाणारे ज्येष्ठ लेखक मारुती चितमपल्ली यांचे ९४ वर्षी निधन झाले.

चितमपल्ली यांनी निसर्गविषयक लेखनातून वाचकांमध्ये निसर्गप्रेमाची जाणीव जागवली. त्यांनी वन्यजीव, पक्षी आणि जैवविविधतेचे अतिशय बारकाईने निरीक्षण करत दर्जेदार लेखन केले. नवेगावबांधचे दिवस, निळावंती, रानवाटा, पाखर माया, जंगलाची दुनिया, यांसारख्या अनेक पुस्तकांचे त्यांनी लेखन केले.

मंत्री नाईक आपल्या शोक संदेशात म्हणतात, पद्मश्री चितमपल्ली यांच्या लेखन आणि कार्यातून अनेक पिढ्यांना निसर्गाशी नातं जोडण्याची प्रेरणा मिळाली.

वनविभागात तीन दशकांहून अधिक सेवा बजावताना त्यांनी कर्नाळा पक्षी अभयारण्य, नवेगाव राष्ट्रीय उद्यान, नागझिरा अभयारण्य आणि मेळघाट व्याघ्र प्रकल्पाच्या विकासासाठी उल्लेखनीय योगदान दिले. पक्षीशास्त्र आणि वन्यजीव क्षेत्रात त्यांनी जागतिक पातळीवरही वेगळी ओळख निर्माण केली.

एप्रिल 2025 मध्ये राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते त्यांचा पद्मश्री पुरस्काराने गौरव करून त्यांच्या कार्याचा सन्मान करण्यात आला होता. मंत्री नाईक यांनी दिवंगत चितमपल्ली यांच्या कुटुंबियांप्रती संवेदना व्यक्त करुन चितमपल्ली यांना आदरांजली वाहिली आहे.

०००

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *