महाराष्ट्र शासनाने सार्वजनिक आरोग्य क्षेत्रात व्यापक परिवर्तन घडवून आणत ‘निरोगी महाराष्ट्र, सक्षम महाराष्ट्र’ या ध्येयाकडे भक्कम पावले टाकली आहेत. प्रतिबंधात्मक आरोग्य सेवा, आधुनिक उपचार सुविधा, तंत्रज्ञानाधारित आरोग्य व्यवस्थापन, महिला व बाल आरोग्य संवर्धन, संसर्गजन्य व असंसर्गजन्य रोगांवरील नियंत्रण; तसेच लोकसहभागाच्या माध्यमातून राज्याची आरोग्य व्यवस्था अधिक सक्षम होत आहे.
मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि सार्वजनिक आरोग्य मंत्री यांच्या नेतृत्वाखाली आरोग्य सेवांचा विस्तार, गुणवत्तापूर्ण उपचार सुविधा आणि आरोग्य जनजागृती यावर विशेष भर देण्यात येत आहे. यामुळे ग्रामीण ते शहरी भागापर्यंत लाखो नागरिकांना आरोग्य सेवांचा लाभ मिळत आहे.
लोकसहभागातून आरोग्य क्रांती
राज्यातील प्रत्येक गाव निरोगी, स्वच्छ आणि आरोग्यदृष्ट्या सक्षम व्हावे या उद्देशाने ‘माझं गाव, आरोग्यसंपन्न गाव’ हा महत्त्वाकांक्षी उपक्रम राबविण्यात येत आहे. ग्रामपंचायत, आशा सेविका, आरोग्य कर्मचारी, युवक मंडळे आणि ग्रामस्थ यांच्या सक्रिय सहभागातून गावागावात आरोग्यदायी वातावरण निर्माण करण्याचा प्रयत्न होत आहे.आरोग्य हा केवळ उपचारांचा विषय नसून लोकचळवळ बनावी, या दृष्टीने हा उपक्रम राज्यभर प्रभावीपणे विस्तारत आहे.
नागरी आरोग्य सेवांचे सक्षम जाळे
राष्ट्रीय नागरी आरोग्य अभियानांतर्गत राज्यात ८१७ नागरी प्राथमिक आरोग्य केंद्रे,४३ नागरी सामुदायिक आरोग्य केंद्रे, १९०४ आयुष्यमान आरोग्य मंदिरे, ६७५ हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाने कार्यरत आहेत.शहरी भागातील नागरिकांना त्यांच्या परिसरातच दर्जेदार प्राथमिक आरोग्य सेवा उपलब्ध करून देण्यात या यंत्रणांची महत्त्वपूर्ण भूमिका आहे.
महिला आरोग्याला नवी दिशा
महिलांच्या आरोग्य संवर्धनासाठी राबविण्यात आलेल्या ‘स्वस्थ नारी, सशक्त परिवार’ अभियानाला राज्यभर उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.या अभियानांतर्गत २.३५ लाखांहून अधिक आरोग्य शिबिरे,१.१३ कोटींहून अधिक महिलांची तपासणी करण्यात आली.उच्च रक्तदाब, मधुमेह, स्तन कर्करोग, गर्भाशय मुखाचा कर्करोग, रक्तक्षय यांसारख्या आजारांचे लवकर निदान करून महिलांना उपचार व समुपदेशन सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या.महिलांच्या रजोनिवृत्तीनंतर उद्भवणाऱ्या आरोग्य समस्यांवर लक्ष केंद्रित करण्यासाठी राज्यातील जिल्हा आणि उपजिल्हा रुग्णालयांमध्ये मेनोपॉज क्लिनिक सुरू करण्यात आली आहेत.
माता व बाल आरोग्यात आघाडी
माता व बाल आरोग्य क्षेत्रात महाराष्ट्राने देशासाठी आदर्श निर्माण केला आहे.एसआरएस-२०२३ अहवालानुसार नवजात मृत्युदर – ११, अर्भक मृत्युदर – १४, पाच वर्षांखालील बालमृत्युदर – १६ इतका कमी झाला आहे. भारताने २०३० पर्यंत साध्य करण्याचे उद्दिष्ट ठेवलेले मानांकन महाराष्ट्राने आधीच गाठले आहे. राज्यातील विशेष नवजात शिशुकाळजी कक्ष, पोषण पुनर्वसन केंद्रे आणि स्तनपान व्यवस्थापन केंद्रांमुळे बाल आरोग्य सेवांना मोठे बळ मिळाले आहे.
दोन कोटींहून अधिक बालकांची आरोग्य तपासणी. राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रमांतर्गत एप्रिल २०२५ ते फेब्रुवारी २०२६ या कालावधीत २.१३ कोटींहून अधिक बालकांची आरोग्य तपासणी करण्यात आली. हजारो बालकांवर हृदय शस्त्रक्रिया व इतर जीवनरक्षक उपचार करून त्यांना नवजीवन देण्यात आले.
प्रभावी लसीकरण मोहिम
राज्यात नियमित लसीकरणाचे ९२ टक्के उद्दिष्ट साध्य झाले आहे.बालकांना विविध संसर्गजन्य आजारांपासून संरक्षण देण्यासाठी व्यापक लसीकरण मोहीम राबविण्यात येत आहे. गर्भाशय मुखाच्या कर्करोगापासून संरक्षणासाठी एचपीव्ही लसीकरण मोहिमेलाही चांगला प्रतिसाद मिळत आहे.
आधुनिक उपचार ग्रामीण भागातही
अत्याधुनिक वैद्यकीय सुविधा ग्रामीण व निमशहरी भागात उपलब्ध व्हाव्यात यासाठी २३ नवीन कार्डियाक कॅथलॅब,लिथोट्रिप्सी सुविधा,अत्याधुनिक निदान सेवा उपलब्ध करून देण्याचे काम सुरू आहे. तसेच शासकीय रुग्णालयांमध्ये अनेक तपासण्या आणि उपचार मोफत उपलब्ध करून देण्यात आले आहेत.
क्षयरोगमुक्त महाराष्ट्राकडे वाटचाल
राष्ट्रीय क्षयरोग निर्मूलन कार्यक्रमांतर्गत राज्यात व्यापक प्रमाणात निदान, उपचार आणि पोषण सहाय्य सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत.२०२५ मध्ये शोधण्यात आलेल्या क्षयरुग्णांपैकी ८८ टक्के रुग्ण उपचारानंतर बरे झाले आहेत. ‘टीबी मुक्त भारत’ अभियानाला महाराष्ट्रातून उत्साहवर्धक प्रतिसाद मिळत आहे.
संसर्गजन्य रोगांवर प्रभावी नियंत्रण
मलेरिया, डेंग्यू, चिकुनगुनिया, कुष्ठरोग, हत्तीरोग आणि रेबीज यांसारख्या आजारांवर नियंत्रण मिळवण्यासाठी राज्यभर विशेष मोहिमा राबविण्यात येत आहेत.स्थानिक स्वराज्य संस्था, आरोग्य कर्मचारी आणि नागरिक यांच्या सहभागामुळे या मोहिमांना प्रभावी यश मिळत आहे.
पॅलिएटिव्ह केअर आणि मानवी स्पर्श
कर्करोग आणि इतर गंभीर आजारांनी ग्रस्त रुग्णांना सन्मानाने जीवन जगता यावे यासाठी राज्यातील ३४ जिल्ह्यांमध्ये पॅलिएटिव्ह केअर सेवा उपलब्ध करण्यात आल्या आहेत.घरभेटी, समुपदेशन, वेदना नियंत्रण आणि दूरवैद्यकीय सेवा यांमुळे हजारो कुटुंबांना आधार मिळत आहे.
रक्तदानात महाराष्ट्र देशात अव्वल
राज्यात २०२५ मध्ये २३.६९ लाख युनिट रक्त संकलित झाले असून त्यापैकी ९९.५८ टक्के रक्तदान स्वैच्छिक स्वरूपाचे आहे.रक्तदान चळवळीत महाराष्ट्राने पुन्हा एकदा देशात अग्रस्थान कायम राखले आहे.
सिकलसेलमुक्त महाराष्ट्रासाठी ‘अरुणोदय’
सिकलसेल अॅनिमिया निर्मूलनासाठी राज्यातील २१ जिल्ह्यांमध्ये ‘अरुणोदय’ अभियान राबविण्यात येत आहे.तपासणी, समुपदेशन आणि जनजागृतीच्या माध्यमातून या आनुवंशिक आजाराविरुद्ध व्यापक लढा उभारण्यात आला आहे.
निरोगी महाराष्ट्राचे स्वप्न साकारतेय
आधुनिक आरोग्य सुविधा, तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर, प्रशिक्षित मनुष्यबळ, महिला व बाल आरोग्यावरील विशेष भर, संसर्गजन्य रोग नियंत्रण आणि लोकसहभाग यांचा समन्वय साधत महाराष्ट्र आरोग्य क्षेत्रात नवे मानदंड निर्माण करीत आहे. ग्रामीण ते शहरी भागापर्यंत प्रत्येक नागरिकाला दर्जेदार आरोग्य सेवा उपलब्ध करून देत राज्य शासन ‘निरोगी महाराष्ट्र, सक्षम महाराष्ट्र’ या ध्येयाच्या दिशेने आत्मविश्वासाने वाटचाल करीत आहे. लोकसहभाग, आधुनिक आरोग्य सेवा आणि सुजाण नागरिक यांच्या बळावर निरोगी महाराष्ट्राचे स्वप्न आता वास्तवात उतरू लागले आहे.
00000
दत्तात्रय कोकरे
विभागीय संपर्क अधिकारी
माहिती व जनसंपर्क महासंचालनालय मंत्रालय मुंबई.