नागोठणे-रोहा येथील नुकसानग्रस्त दुकानदारांना लवकरच भरपाई – मंत्री आदिती तटकरे

मुंबई, दि. ५ : रायगड जिल्ह्यातील नागोठणे व रोहा परिसरात अतिवृष्टीमुळे बाधित झालेल्या दुकानदारांना नुकसानभरपाई तातडीने देण्यासाठी आवश्यक कार्यवाही करावी. त्यासाठी विभागीय स्तरावरील प्रस्ताव शासनाकडे सादर करण्याचे निर्देश महिला व बाल विकास मंत्री आदिती तटकरे यांनी दिले.

नैसर्गिक आपत्तीमुळे घरे, दुकाने, शेती व पशुधनाच्या नुकसानीचा आढावा घेण्यासाठी मंत्रालयात आयोजित बैठकीत त्या बोलत होत्या. यावेळी रायगडचे जिल्हाधिकारी किशन जावळे दूरदृश्य प्रणालीद्वारे उपस्थित होते. उपविभागीय अधिकारी, तहसीलदार, कार्यकारी अभियंता यावेळी उपस्थित होते. मंत्री तटकरे म्हणाल्या की, अतिवृष्टीमुळे अनेक कुटुंबांच्या उपजीविकेवर परिणाम झाला असून, विशेषतः दुकानदारांना तातडीने आर्थिक दिलासा मिळणे आवश्यक आहे. त्यामुळे नागोठणे व रोहा परिसरातील नुकसानग्रस्त दुकानांसाठी तीन कोटी ५३ लाख ५० हजार रुपयांचा प्रस्ताव तातडीने सादर करावा. प्रस्ताव प्राप्त होताच त्यास मंजुरी देण्यात येईल, असे त्यांनी स्पष्ट केले.

नैसर्गिक आपत्तीतील नुकसानभरपाईसाठी आवश्यक कागदपत्रांबाबतही सूचना देण्यात आल्या. दुकानांच्या नुकसानीचे पंचनामे पूर्ण झाले असून, संबंधित प्रस्तावासोबत आवश्यक प्राधिकृत प्रमाणपत्र जोडून प्रकरणे तातडीने सादर करण्याचे निर्देश देण्यात आले.

याशिवाय, अतिवृष्टीमुळे बाधित झालेल्या घरांमध्ये वास्तव्यास असलेल्या भाडेकरूंनाही शासनाच्या मदतीचा लाभ मिळावा, यासाठी घरमालकांनी संबंधित पत्र देणे आवश्यक असल्याचे सांगण्यात आले. पात्र प्रत्येक भाडेकरूला ५ हजार रुपयांची आर्थिक मदत देण्यात येणार असून, आतापर्यंत १,७३७ लाभार्थींना मदत वितरीत करण्यात आली आहे. उर्वरित १५१ भाडेकरूंनी आवश्यक कागदपत्रे सादर करताच त्यांनाही तातडीने आर्थिक सहाय्य देण्यात येईल.  शेती, पशुधन, घरे आणि व्यावसायिक आस्थापनांच्या नुकसानीची प्रकरणे प्राधान्याने निकाली काढून आपत्तीग्रस्तांना त्वरित दिलासा देण्यासाठी सर्व संबंधित यंत्रणांनी समन्वयाने कार्य करावे, असे निर्देशही मंत्री आदिती तटकरे यांनी यावेळी दिले.

0000

श्रद्धा मेश्राम/विसंअ

 

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *