नवीन प्रशासकीय इमारतीमुळे जतच्या वैभवात भर पडेल – मंत्री जयकुमार गोरे  

सांगली, दि. १६ (जिमाका) : जत येथे 15 कोटी रूपये खर्चून बांधण्यात येणाऱ्या जत पंचायत समितीच्या नवीन प्रशासकीय इमारतीमुळे जत शहराच्या वैभवात भर पडेल. जत तालुक्यातील देवस्थानांचा विकास आणि प्रत्येक गावात पायाभूत सुविधा तसेच विकास कामासाठी आवश्यक निधी उपलब्ध करून देऊ, अशी ग्वाही ग्रामविकास व पंचायतराज मंत्री जयकुमार गोरे यांनी आज दिली.

जत येथे पंचायत समितीच्या नूतन प्रशासकीय इमारतीचे भूमिपूजन मंत्री गोरे यांच्या हस्ते करण्यात आले. त्या प्रसंगी आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी आमदार सदाभाऊ खोत, आमदार गोपीचंद पडळकर, जतचे नगराध्यक्ष डॉ. रविंद्र आरळी, उपनगराध्यक्ष विक्रम ताड, जत पंचायत समिती सभापती अर्चना पाटील, उपसभापती रविकुमार बगली, जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी मनोज जाधव, तहसीलदार प्रवीण धानोरकर, उपमुख्य कार्यकारी अधिकारी (ग्रामपंचायत) शशिकांत शिंदे, गटविकास अधिकारी मुक्तेश्वर माडगुळकर, जिल्हा परिषद कार्यकारी अभियंता कुंडलिक उबाळे आदी मान्यवर उपस्थित होते.

मंत्री गोरे म्हणाले, जत पंचायत समितीच्या नवीन प्रशासकीय इमारतीमध्ये फर्निचरसाठी आणखी निधी लागल्यास तो उपलब्ध करून देऊन सर्व व्यवस्था उपलब्ध करून देऊ. या इमारतीमुळे सामान्य नागरिकांना सुविधा मिळून प्रशासकीय अधिकारी व कर्मचाऱ्यांनाही काम करणे सोयीचे होणार आहे. जत तालुक्यात पहिल्याच टप्प्यात 8 देवस्थानांना ‘ब’ वर्ग दर्जा देण्याचा ऐतिहासिक निर्णय ग्रामविकास विभागाने घेतला आहे. या प्रत्येक देवस्थानच्या विकासासाठी प्रत्येकी ५ कोटी रुपये याप्रमाणे एकूण ४० कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे, असे त्यांनी सांगितले.

जत तालुक्यात मागील वर्षात 22 ग्रामपंचायत इमारती मंजूर करण्यात आल्याचे सांगून मंत्री गोरे म्हणाले, जत तालुक्यातील ग्रामीण रस्त्यांच्या जाळ्यासाठी एकूण ७५ कोटी रुपयांचा निधी उपलब्ध होणार असून, यामुळे दळणवळणाचा प्रश्न सुटण्यास मोठी मदत होणार आहे. ज्या गावात स्मशानभूमी नाही त्यासाठीही आवश्यक निधी दिला जाईल. यासाठी प्रस्ताव सादर करावा, असेही ते यावेळी म्हणाले.

यावेळी आमदार सदाभाऊ खोत यांनी जत तालुक्यात करण्यात येत असलेल्या विविध विकास कामांची स्तुती केली.

आमदार गोपीचंद पडळकर म्हणाले, ग्रामीण भागातील प्रशासकीय सुविधा मजबूत करण्यासाठी विविध विकासकामे हाती घेतली असून पंचायत समितीच्या नवीन प्रशासकीय इमारतीमुळे अधिकारी व नागरिक दोघांनाही सुविधा मिळतील. जतच्या सौंदर्यात भर पडणारी ही इमारत येत्या काही महिन्यात भव्य दिव्य स्वरूपात पहावयास मिळणार आहे. गोरगरीबांना घरकुल व सोलर पॅनेल, क्रीडांगण विकास, प्राणी संग्रहालय, मंदिरांचा विकास, जिल्हा परिषद शाळा दुरूस्ती व सोयी सुविधा, बेरोजगारांना प्रशिक्षण, शेतीसाठी व पिण्यासाठी स्वच्छ पाणी आदि कामे शासनाच्या माध्यमातून पूर्ण करून या भागाचा कायापालट करू.

यावेळी नगराध्यक्ष डॉ. रविंद्र आरळी यांनी मनोगत व्यक्त केले.

प्रारंभी मंत्री गोरे यांच्या हस्ते जत पंचायत समितीच्या नूतन इमारतीचे भूमिपूजन व कोनशिला अनावरण करण्यात आले. जिल्हा परिषद शाळा रामपूरच्या विद्यार्थिनीनी स्वागतगीत सादर केले. मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन करण्यात आले.

यावेळी आवास योजनेत उत्कृष्ट कामगिरी केल्याबद्दल जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी मनोज जाधव यांचा सत्कार करण्यात आला. तसेच बांधकाम कामगार लाभार्थ्यांना प्रातिनिधीक स्वरूपात साहित्य वाटप करण्यात आले.

गटविकास अधिकारी माडगुळकर यांनी प्रास्ताविक केले. पंचायत समिती सदस्‍य विजय रूपनर यांनी आभार मानले. कार्यक्रमास जिल्हा परिषद, पंचायत समिती, नगरपालिका, ग्रामपंचायतींचे पदाधिकारी, सदस्य, विविध विभागांचे अधिकारी, कर्मचारी आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

०००

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *