देशातील कर्तबगार स्त्रियांचा आदर्श विद्यार्थिनींनी घ्यावा – मंत्री चंद्रकांत पाटील

मुंबई, दि. १८ : देशातील कर्तबगार स्त्रियांचा आदर्श आजच्या विद्यार्थिनींनी घेऊन आपापल्या क्षेत्रात अग्रेसर राहिले पाहिजे, असे आवाहन उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी केले.

Milind Kadam M4B

सिडनहॅम महाविद्यालयाच्या माजी विद्यार्थिनी आणि आशिया खंडातील पहिल्या महिला वाणिज्य पदवीधर यास्मिन खुर्शीदजी सर्वेअर यांच्या पदवीला शंभर वर्षे पूर्ण झाल्याचे औचित्य साधून आयोजित विशेष कार्यक्रमात मंत्री पाटील बोलत होते.

यावेळी सेंट्रल बँक ऑफ इंडियाच्या पहिल्या महिला कर्मचारीयास्मिन सर्वेअर यांच्या सन्मानार्थ बँकेच्या प्रायोजकत्वाने महाविद्यालयात स्थापित सर्वेअर यांच्या अर्धाकृती पुतळ्याचे अनावरण मंत्री पाटील यांच्या हस्ते करण्यात आले.

Milind Kadam M4B

मंत्री पाटील म्हणाले की, यास्मिन सर्वेअर यांनी १८ ऑगस्ट १९२५ रोजी सिडनहॅम महाविद्यालयातून वाणिज्य शाखेत पदवी संपादन केली होती. त्या काळात महिलांनी उच्च शिक्षण घेणे हे दुर्मिळ मानले जात असल्याने त्यांचा हा प्रवास ऐतिहासिक ठरला. आज वाणिज्य क्षेत्रात आपला ठसा उमटविणाऱ्या महिलांना यास्मिन सर्वेयर यांनी शंभर वर्षांपूर्वी वाणिज्य विभागाचे दालन खुले करून दिले. आजच्या विद्यार्थिनींसाठी त्या प्रेरणास्थान आहेत. यावर्षीपासून महाविद्यालय व सेंट्रल बँक ऑफ इंडिया यांच्या संयुक्त विद्यमाने सिडनहॅम महाविद्यालयात वाणिज्य विभागात पदवी परीक्षेत प्रथम क्रमांक मिळवणाऱ्या विद्यार्थिनींसाठी यास्मिन सर्वेयर यांच्या नावाने एक लाख रुपयांची विशेष शिष्यवृत्ती सुरू करण्यात येत आहे.

Milind Kadam M4B

माजी विद्यार्थिनी व प्रसिद्ध पार्श्वगायिका संजीवनी भेलांडे यांनी इंग्रजीमध्ये अनुवादित केलेल्या मिराबाई यांच्या रचना सादर केल्या. याचे औचित्य साधून मंत्री पाटील यांनी महाविद्यालयासाठी एका नवीन स्पर्धेची घोषणा केली. दर महिन्याला मीराबाईंची एक रचना संजीवनी भेलांडे  देतील, त्याचे अर्थपूर्ण विवेचन स्वतःच्या आवाजात करणाऱ्या  विद्यार्थी- विद्यार्थिनीस पंचवीस हजारांचे रोख पारितोषिक देण्यात येईल. या उपक्रमाची सुरुवात आतापासूनच करूयात, असे आवाहनही मंत्री पाटील यांनी विद्यार्थ्यांना केले.

Milind Kadam M4B

मीराबाईंच्या भजनाचे गायन आणि विवेचन करणाऱ्या विद्यार्थ्यांना विशेष बक्षीस जाहीर

उपस्थित विद्यार्थ्यांपैकी मीराबाईंच्या भजनाचे वाचन आणि विवेचन करणाऱ्या पाच विद्यार्थ्यांना उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी रोख बक्षीस दिले.

राज्यातील एकल महिलांच्या सबलीकरण आणि सशक्तीकरणासाठी राज्य शासन त्यांना पेन्शन आणि व्यवसाय उभारण्यासाठी मदत करण्याच्या विचारात आहे. तसेच डॉ. होमी भाभा स्टेट युनिव्हर्सिटीमध्ये होणाऱ्या नाविन्यपूर्ण विविध कोर्सेस आणि उपक्रमांचे मंत्री पाटील यांनी कौतुक केले.

यावर्षीपासून महाविद्यालय व सेंट्रल बँक ऑफ इंडिया यांच्या संयुक्त विद्यमाने  सिडनहॅम महाविद्यालयात वाणिज्य विभागात पदवी परीक्षेत प्रथम क्रमांक मिळवणाऱ्या विद्यार्थिनींसाठी यास्मिन सर्वेयर यांच्या नावाने  एक लाख रुपयांची विशेष शिष्यवृत्ती सुरू करण्यात येत असल्याची घोषणा मंत्री पाटील यांनी यावेळी केली.

या कार्यक्रमास मुंबई शहरच्या जिल्हाधिकारी आंचल गोयल, डॉ. होमी भाभा स्टेट विद्यापीठाचे कुलगुरू प्रा. रजनीश कामत, सिडनहॅमच्या माजी विद्यार्थिनी दिलनवाज वारीयावा, पार्श्वगायिका संजीवनी भेलांडे, यास्मिन सर्वेयर यांचे नातेवाईक सोली कूपर, सेंट्रल बँक ऑफ इंडियाच्या पॉपी शर्मा, सिडनहॅम महाविद्यालयाचे प्राचार्य श्रीनिवास धुरु यांच्यासह महाविद्यालयातील प्राध्यापक व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. प्राचार्य डॉ. श्रीनिवास धुरु यांनी आभार मानले.

०००

काशीबाई थोरात/विसंअ

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *