देशाचा ८०वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा

छत्रपती संभाजीनगरदि.१५(जिमाका)- विविधतेने नटलेला आपला देश एकसंघ ठेवण्यात डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलेल्या राज्यघटनेचे मोठे योगदान आहे. जिल्ह्याचा विकास करत असतांना सर्वसामान्य माणूस हाच केंद्रबिंदू आहे. आपण समाजातील सर्व घटक मिळून विकास प्रक्रियेत सहभागी होऊ, असे आवाहन राज्याचे सामाजिक न्याय मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री संजय शिरसाट यांनी आज केले.

देशाचा ८० वा स्वातंत्र्य दिन आज मोठ्या उत्साहात साजरा झाला. जिल्ह्याचा मुख्य शासकीय सोहळा विभागीय आयुक्त कार्यालयाच्या प्रांगणात पार पडला. प्रारंभी वंदेमातरम गायन झाले. त्यानंतर पालकमंत्री शिरसाट यांच्या हस्ते ध्वजारोहण झाले. पोलीस वाद्यवृंदाच्या तालावर राष्ट्रगीत होऊन राष्ट्रध्वजास मानवंदना देण्यात आली. त्यानंतर राज्यगीत झाले. आपल्या संबोधनात पालकमंत्री शिरसाट यांनी स्वातंत्र्यासाठी बलिदान दिलेल्या स्वातंत्र्यसैनिकांचे स्मरण केले. हुतात्म्यांना अभिवादन करुन आदरांजली वाहिली.

सोहळ्यास विधानपरिषदेचे सदस्य आ. अंबादास दानवे, माजी खा. चंद्रकांत खैरे, विभागीय आयुक्त जी.श्रीकांत,जिल्हाधिकारी विनय गौडा जी.सी., मनपा आयुक्त अमोल येडगे, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मिन्नू पी.एम.,छत्रपती संभाजीनगर परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक विरेंद्र मिश्र, पोलीस आयुक्त प्रवीण पवार, जिल्हा पोलीस अधीक्षक प्रकाश जाधव तसेच सर्व वरिष्ठ अधिकारी, सामाजिक कार्यकर्ते, स्वातंत्र्य सैनिक, लोकप्रतिनिधी आदी उपस्थित होते.

त्यानंतर ते म्हणाले की,देशाचा स्वातंत्र्य दिन साजरा होत असतांना या आनंदात प्रत्येक देशवासी सहभागी झाला आहे.आपापसातले सर्व भेद विसरुन सर्व जाती धर्माचे लोक एकत्रितपणे स्वातंत्र्याचा आनंद घेत आहेत, हे या देशाचे वैशिष्ट्य आहे. विविधतेने नटलेला हा देश एकसंघ ठेवण्यात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी लिहिलेल्या राज्यघटनेचे मोठे योगदान आहे. आपल्या सगळ्यांसाठी आपली राज्यघटना सर्वोपरी आहे. आपल्या आधीच्या पिढ्यांनी केलेल्या त्याग आणि बलिदानामुळेच हे स्वातंत्र्य आपण उपभोगत आहोत,याचे स्मरण प्रत्येकाने ठेवावे असे त्यांनी सांगितले.

ते पुढे म्हणाले की, आपले राज्य प्रगती करत असतांना शासनाचा केंद्रबिंदू हा सर्वसामान्य माणूस आहे. विकास करतांना तो सर्व घटकांचा झाला पाहिजे, हेच शासनाचे धोरण आहे. आपण सर्व मिळून त्यात सहभागी होऊ. एकत्रितपणे देशाचा विकास करु,असे आवाहन त्यांनी केले. जिल्ह्यात शासनामार्फत विविध योजनांद्वारे लोकांना देण्यात येत असलेला लाभ,  घाटी रुग्णालयाला सुपर स्पेशालिटी रुग्णालय बनविण्याचा संकल्प, खेळाडूंसाठी आंतरराष्ट्रीय दर्जाच्या सुविधा, अत्याधुनिक अग्निशामक दल अशा अनेक सुविधा उपलब्ध करुन देत असल्याबाबत त्यांनी उपस्थितांना सांगितले.

जलसंधारणाची शपथ

त्यानंतर पालकमंत्री शिरसाट यांनी सगळ्यांना जलसंधारण सप्ताहाची शपथ दिली. तसेच यानिमित्ताने राबविण्यात येणाऱ्या सप्ताहाच्या लोगोचे अनावरणही पालकमंत्र्यांच्या हस्ते करण्यात आले. तसेच विविध पुरस्कार वितरण व लोकार्पण सोहळ्याला पालकमंत्र्यांनी उपस्थिती लावली. उपस्थित स्वातंत्र्य सैनिक, लोकप्रतिनिधी, सामाजिक कार्यकर्ते आदिंना भेटून त्यांनी स्वातंत्र्यदिनाच्या शुभेच्छा दिल्या.

स्वच्छता वाहनांचे लोकार्पण

याप्रसंगी पालकमंत्री शिरसाट यांच्या हस्ते सात जेटींग स्वच्छता वाहनांचे लोकार्पण करण्यात आले. ही वाहने छत्रपती संभाजीनगर महानगरपालिका, कन्नड, पैठण, सोयगाव, वैजापूर, फुलंब्री, गंगापुर या नगरपालिकांना वितरीत करण्यात आली.

कक्ष नुतनीकरण उद्घाटन

त्यानंतर पालकमंत्री शिरसाट यांनी विभागीय आयुक्त कार्यालयातील दालन व कक्ष नुतनीकरणाचे उद्घाटन करुन पाहणी केली व मराठवाडा मुक्ती संग्राम स्मारकाच्या बांधकामाबाबत आढावाही घेतला.

याप्रसंगी वितरीत करण्यात आलेले पुरस्कारः-

पोलीस उत्कृष्ट सेवा पदक- छत्रपती संभाजीनगर परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक विरेंद्र मिश्र, पोलीस अधीक्षक प्रकाश जाधव, अपर पोलीस अधीक्षक शशिकांत शिंगारे, पोलीस उपायुक्त शशिकांत सातव.

अति उत्कृष्ट सेवा पदक-सुभाष भुजंग,उपविभागीय पोलीस अधिकारी सिल्लोड विश्वजीत काईगडे, अविनाश आघाव, अमोल देशमुख, अविनाश बागुल, रफिक पठाण,किरण गावंडे, इम्तियाज अहमद,विठ्ठल राख,प्रदीप धनवे, बाळू थोरात,आत्माराम पैठणकर, देविसिंग ठाकूर, शिरीष वाघ, विनोद आघाव.

०००००

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *