डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सवाच्या नियोजनाची काटेकोर अंमलबजावणी करा – कोकण विभागीय आयुक्त रुबल अग्रवाल

मुंबई, दि. ९ : भारतीय संविधानाचे शिल्पकार, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या दि. १४ एप्रिल २०२६ रोजी होणाऱ्या जयंती उत्सवासाठी देशभरातून लाखो नागरिक चैत्यभूमीवर अभिवादनासाठी येतात. हा जयंती उत्सव सुरळीत पार पडण्यासाठी पोलीस, महानगरपालिका व जिल्हा प्रशासनाने परस्पर समन्वयाने काम करावे. जयंती उत्सवाच्या पार्श्वभूमीवर करण्यात आलेल्या नियोजनाची सर्व यंत्रणांनी काटेकोर अंमलबजावणी करावी, असे निर्देश कोकण विभागीय आयुक्त रुबल अग्रवाल यांनी दिले.

कोकण विभागीय आयुक्त अग्रवाल यांच्या अध्यक्षतेखाली भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३५ व्या जयंतीच्या पूर्वतयारीच्या अनुषंगाने आढावा बैठक मुंबई शहर जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन भवन येथे झाली. बैठकीस अपर आयुक्त फरोग मुकादम, अपर जिल्हाधिकारी बप्पासाहेब थोरात, निवासी उपजिल्हाधिकारी डॉ. शिवनंदा लंगडापुरे, भन्ते डॉ. राहूल बोधी महाथेरो, डॉ. बाबासाहेब आंबेडकर महापरिनिर्वाणदिन समन्वय समितीचे सरचिटणीस नागसेन कांबळे, दादर चैत्यभूमी स्मारक समितीचे प्रतिनिधी यांच्यासह विविध विभागाचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. तर कोकण विभागातील सर्व जिल्हाधिकारी दूरदृश्य प्रणालीद्वारे बैठकीस सहभागी झाले.

विभागीय आयुक्त अग्रवाल म्हणाल्या, गर्दी व्यवस्थापन, वाहतूक नियंत्रण आणि कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी पोलीस विभागाने विशेष दक्षता घ्यावी. तसेच महानगरपालिकेने स्वच्छता, पिण्याचे पाणी, तात्पुरत्या शौचालयांची व्यवस्था व आरोग्य सेवा याबाबत योग्य नियोजन करावे. चैत्यभूमी परिसरातील स्वच्छता, साफसफाई याबाबत संबंधित यंत्रणांनी काटेकोरपणे जबाबदारी पार पाडावी. कोकण विभागातील जिल्ह्यांमध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यांची रोषणाई, संविधानाच्या प्रतींचे वाटप, जनजागृतीपर कार्यक्रम, व्याख्याने तसेच सामाजिक समतेचा संदेश देणारे विविध उपक्रम आयोजित करण्यात यावेत, असे निर्देश विभागातील जिल्हाधिकाऱ्यांना त्यांनी दिले.

कोकण विभागातील सर्व जिल्हाधिकाऱ्यांनी जिल्ह्यांमध्ये सामाजिक समता सप्ताह आणि भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त राबविण्यात येणाऱ्या विविध उपक्रमांची माहिती दिली.

बैठकीत चैत्यभूमीवर हेलिकॉप्टरद्वारे पुष्पवृष्टी, नियंत्रण कक्ष, आरोग्य सेवा, रुग्णवाहिका, रेल्वे व्यवस्था, बेस्ट व्यवस्था, पिण्याचे पाणी, भोजन व्यवस्था, सीसीटीव्ही देखरेख, पोलीस बंदोबस्त तसेच वाहतूक नियोजन यासंदर्भात विभागीय आयुक्तांनी निर्देश दिले.

०००

शैलजा पाटील/विसंअ

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *