डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठात शिवार फेरी व चर्चा सत्राचा शुभारंभ

अतिवृष्टीबाधित शेतकऱ्यांना तत्काळ भरपाई देणार

अकोला, दि. २० : कृषी यांत्रिकीकरण, आधुनिक तंत्रज्ञान व पाण्याचा सुयोग्य वापर याद्वारे शेती क्षेत्राच्या विकासासाठी नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प व कृषी समृद्धी योजनेत शासनाने मोठी तरतूद केली आहे. नैसर्गिक संकटात शेतकरी बांधवांना पाठबळ देण्यासाठी राज्य शासन खंबीरपणे उभे आहे. राज्यातील एकही अतिवृष्टीबाधित शेतकरी भरपाईपासून वंचित राहणार नाही, अशी ग्वाही राज्याचे कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांनी आज येथे दिली.

डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ व कृषी विभागाच्या संयुक्त विद्यमाने विद्यापीठ परिसरात आयोजित शिवार फेरी व चर्चा सत्राच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते. कृषी राज्यमंत्री आशिष जयस्वाल, कुलगुरू डॉ. शरद गडाख, खासदार अनुप धोत्रे, आमदार प्रकाश भारसाकळे, आमदार हरीश पिंपळे, आमदार वसंत खंडेलवाल, आमदार किरण सरनाईक,  वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. इंद्र मणी, नागपूर येथील पशुसंवर्धन विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. नितीन पाटील आदी यावेळी उपस्थित होते.

कृषी मंत्री श्री. भरणे म्हणाले की, कृषी क्षेत्राच्या विकासासाठी नानाजी देशमुख कृषी संजीवनी योजनेत सुमारे ६ हजार कोटी, कृषी समृद्धी योजनेसाठी ५ हजार कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. नवे तंत्रज्ञान, साधने शेतकऱ्यांपर्यंत पोहोचविण्यासाठी विविध योजना, उपक्रम राबविण्यात येणार आहेत. यंदा राज्यात अतिवृष्टीचे संकट उद्भवून आतापर्यंत ६३ लक्ष ५१ हजार ५२० हे. इतके नुकसान झाले. राज्य शासन नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या खंबीरपणे पाठीशी आहे. भरपाईपासून कुणीही वंचित राहणार नाही, अशी ग्वाही त्यांनी दिली.

एकात्मिक शेतीकडे वळण्याची गरज

ते पुढे म्हणाले की, बदलते पर्यावरण, वेळोवेळी येणारी नैसर्गिक संकटे  शेती क्षेत्रासमोर आहेत. या काळात शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढविण्यासाठी एकात्मिक शेती पद्धती, पूरक व्यवसायांचा अवलंब करणे आवश्यक आहे. योजनांचा लाभ शेतकऱ्यांपर्यंत पोहोचावा व पिकाला चांगला बाजारभाव मिळावा, नैसर्गिक संकटातही किफायतशीर शेतीपद्धती निर्माण व्हावी यादृष्टीने संशोधन व प्रयत्न व्हावेत, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.

कृषी विद्यापीठाने नवनवीन वाणांचे संशोधन पुढे आणले आहे. त्याची माहिती व लाभ शिवार फेरीत शेतकऱ्यांना होईल. त्याचप्रमाणे, शेतकऱ्यांना येणा-या अडचणी, त्यांच्या शंकांचे निरसनही चर्चासत्राच्या माध्यमातून होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

कृषी राज्यमंत्री श्री. जयस्वाल म्हणाले की, ‘विकेल ते पिकेल’ ही संकल्पना शासन प्रभावीरीत्या राबवत असून, विविध योजना-उपक्रमांसाठी कृषी बजेट वाढविण्याचा प्रयत्न सातत्याने होत आहे. कृषी क्षेत्रात ’ए आय’सारखे अद्ययावत तंत्रज्ञान विविध बाबतीत उपयोगात आणले जात आहे. शेतीचे उत्पादन वाढविण्यासाठी विद्यापीठांनी संशोधनांबरोबरच उपक्रमांना चालना द्यावी, असे त्यांनी सांगितले. खासदार श्री. धोत्रे यांनी मनोगत व्यक्त केले. कुलगुरु डॉ. गडाख यांनी विद्यापीठाच्या विविध उपक्रमांची माहिती दिली. डॉ. किशोर बिडवे यांनी सूत्रसंचालन केले.

कृषी मंत्री श्री. भरणे यांनी प्रारंभी शिवार फेरीतील थेट प्रात्यक्षिकांची पाहणी केली व विविध प्रयोगांबाबत जाणून घेतले. कृषी विद्यापीठाच्या पशुसंवर्धन व दुग्धशास्त्र विभागातील गांडूळ खत व व्हर्मीवॉश उत्पादन प्रकल्प, साहिवाल गो संवर्धन प्रकल्प, भाजी, फुले, फळ संशोधन प्रकल्प तसेच विविध विभागांच्या संशोधन प्रकल्पांना भेट देऊन पाहणी केली.

०००

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *