ठाण्यातील कावेसर येथील वनजमिनीवरील बांधकामप्रकरणी संयुक्त अहवाल सादर करण्याचे निर्देश— विधानसभा उपाध्यक्ष अण्णा बनसोडे

मुंबई, दि. २२ : मौजे कावेसर (ठाणे) येथील सर्व्हे क्रमांक १२९ मधील वन विभागाच्या जमिनीवरील बांधकाम आणि वन नोंदींबाबतच्या प्रकरणावर त्वरित कार्यवाही करण्यासाठी महसूल व वन विभागाने संयुक्त पाहणी करून तातडीने अहवाल सादर करावा, असे निर्देश विधानसभा उपाध्यक्ष अण्णा बनसोडे यांनी दिले.

यासंदर्भातील निवेदन अजित नथुराम पाटील यांनी दिले होते. त्यानुसार महसूल विभाग, ठाणे महापालिका, ठाणे जिल्हाधिकारी, ठाणे उपविभागीय अधिकारी तसेच वन विभागाची बैठक उपाध्यक्ष बनसोडे यांच्या अध्यक्षतेखाली विधानभवन येथील दालनात पार पडली.

कावेसर येथील वनजमिनीच्या नोंदीत बदल करून केलेल्या बांधकामामुळे सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाचे उल्लंघन झाल्याचा आरोप निवेदनात करण्यात आला आहे. या पार्श्वभूमीवर, याप्रकरणी कायदेशीर निर्णय घेणे शक्य होण्यासाठी संबंधित सर्व कागदपत्रे, महसूल नोंदी, वन नोंदी तसेच बांधकाम परवानग्यांची पडताळणी सर्व संबंधित विभागांनी करावी.

त्यानंतर या पडताळणीच्या अनुषंगाने सविस्तर व वस्तुनिष्ठ अहवाल प्राधान्याने सादर करावा, असे निर्देश उपाध्यक्ष बनसोडे यांनी यावेळी दिले.

0000

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *