कोल्हापूर, दि. ११ (जिमाका) :जिल्ह्यात कृषी विभागाचे काम चांगले असून यांत्रिकीकरणात जिल्हा अग्रेसर आहे. यात नवनवीन सुधारणा आवश्यक आहेत. उत्पादन वाढ लक्षात घेत शेतीमधील नव्या सुधारणा आणि उत्पादन वाढ दाखवा अशी विचारणा पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांनी केली. खरीप हंगाम पूर्व आढावा पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हाधिकारी कार्यालयातील ताराराणी सभागृहात घेण्यात आला. बैठकीला आमदार शिवाजी पाटील, सीईओ डॉ. जॅसमिन, निवासी उपजिल्हाधिकारी गजानन गुरव, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी जालिंदर पांगरे आणि कृषी विभागाचे इतर अधिकारी उपस्थित होते.
कृषी विस्तार कामे वाढवा, माती परीक्षण मोहीम यशस्वी करा, नव तंत्रज्ञान विकसित करून शेतकऱ्यांच्या उत्पादनात वाढ होईल यासाठी प्रत्यक्ष बांधावर जावून काम करा अशा सूचना त्यांनी केल्या. शेतकऱ्यांचे शिक्षक बना. शेतकऱ्यांना गावात जावून मदत करा. मागील कालावधीत कामात कमी आढळून आलेल्या कृषी अधिकाऱ्यांना नोटीस बजावून त्यांच्यावर कारवाई करा. कृषी विषयक सुरू असलेले काम आणि प्रोग्रेस त्या त्या तालुक्यात लोकप्रतिनिधींना द्या. यांत्रिकीकरणाला अजून गती द्या. पुढील एक महिना ‘एक दिवस बळीराजा’ अभियानाला गती देत मिशन मोडवर कामे करा. एका महिन्यानंतर पुन्हा बैठक होईल, यात सुधारणा झालेल्या दिसाव्यात असे निर्देश त्यांनी दिले.
पुढील महिन्यासाठी कृषी विभागाला पंचसूत्रीवर भर देण्याचे निर्देश पालकमंत्र्यांनी दिले आहेत. यात माती परीक्षण मोहीम, शेतकऱ्यांच्या बांधावर जावून काम, १ महिना विशेष मोहीम, ‘एक दिवस बळीराजा’ मोहीम अजून परिणामकारक राबवा आणि शेती परवडत नाही म्हणणाऱ्या शेतकऱ्यांना प्राधान्याने मदत करा यांचा समावेश आहे. बैठकीत ‘मागेल त्याला काजू कलमे’, ‘हुमणी कीड नियंत्रण पत्रक’ आणि ‘संतुलित खत माहिती पत्रका’चे विमोचन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.
कोल्हापूर जिल्ह्याचा आगामी खरीप हंगाम २०२६ च्या पूर्वतयारीसाठी जिल्हा आता सज्ज झाला असून, जिल्ह्याचे एकूण ३ लाख ९१ हजार हेक्टर खरीप क्षेत्राचे नियोजन करण्यात आले आहे. यामध्ये सर्वाधिक ५१% क्षेत्र म्हणजे १,९८,६०४ हेक्टर ऊस पिकाखाली आहे. कोल्हापूर जिल्ह्याची भात आणि सोयाबीनची उत्पादकता राज्याच्या सरासरीपेक्षा लक्षणीय असून, यंदा भातासाठी ९०,६४० हेक्टर आणि सोयाबीनसाठी ४१,४४५ हेक्टर क्षेत्रावर पेरणी अपेक्षित आहे. खत आणि बियाण्यांच्या उपलब्धतेबाबत माहिती देताना सांगण्यात आले की, २०,०६६ क्विंटल बियाणांची मागणी असून १० मे पर्यंत ५,१३६ क्विंटलचा पुरवठा झाला आहे, तर १,८८,५४८ मे.टन खतांच्या मागणीपैकी सध्या ५२,३४३ मे.टन साठा जिल्ह्यात शिल्लक आहे.
शेतकऱ्यांच्या आर्थिक सक्षमीकरणासाठी राबवल्या जाणाऱ्या विविध योजनांचाही यावेळी आढावा घेण्यात आला. कृषी यांत्रिकीकरणासाठी ६,८६० शेतकऱ्यांना ३१ कोटी ५८ लाख रुपयांचे अनुदान थेट खात्यात वितरित करण्यात आले आहे. प्रधानमंत्री किसान सन्मान निधी आणि नमो शेतकरी महासन्मान निधीअंतर्गत जिल्ह्याला अनुक्रमे २८३ कोटी आणि २७० कोटी रुपयांचा निधी वितरित झाला आहे. २०२६-२७ च्या खरीप हंगामासाठी २,१८,२३४ लाख रुपयांचे कर्ज वाटपाचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. तसेच जिल्ह्यात फळबाग लागवडीलाही गती मिळत असून, आतापर्यंत १,३३६.६२ हेक्टर क्षेत्रावर आंबा, काजू, नारळ आणि केळीची लागवड यशस्वीरीत्या करण्यात आली आहे. विशेष म्हणजे, प्रधानमंत्री सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग (PMFME) योजनेत कोल्हापूर जिल्ह्याने महाराष्ट्रात प्रथम क्रमांक पटकावला आहे.
पालकमंत्र्यांनी प्रशासनाला बोगस खते आणि बियाणे विक्री करणाऱ्यांवर कडक कारवाई करण्याचे आदेश दिले. तसेच वन्यप्राण्यांमुळे होणाऱ्या शेती नुकसानीवर वन विभागाने तातडीने उपाययोजना कराव्यात आणि प्रलंबित पीक विमा प्रकरणे त्वरित निकाली काढावीत, अशा सूचना त्यांनी दिल्या.
पालकमंत्र्यांनी शेतकऱ्यांना ‘हुमणी कीड नियंत्रण स्पर्धा २०२६-२७’ मध्ये सहभागी होण्याचे आणि ‘मागेल त्याला काजू कलमे’ योजनेचा लाभ घेण्यासाठी महाडीबीटी पोर्टलवर अर्ज करण्याचे आवाहन केले आहे. सिंचनाचे नियोजन योग्य रीतीने केल्यास जिल्हा पुन्हा एकदा विक्रमी उत्पादकता साध्य करेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
0000