जिद्द आणि प्रयत्नांची भरारी: गृहिणी ते उद्योजिका — वंदना शेरेकर यांचा प्रेरणादायी प्रवास

आजच्या काळात महिला केवळ चूल आणि मूल यापुरत्या मर्यादित न राहता विविध क्षेत्रात आपल्या कर्तृत्वाचा ठसा उमटवत आहेत. अशाच एका जिद्दी महिला उद्योजिका म्हणजे अमरावती येथील वंदना प्रविण शेरेकर. उच्चशिक्षित असूनही घरात बसून न राहता त्यांनी स्वतःचा उद्योग उभा करण्याचा निर्णय घेतला आणि आज ‘वंदना मल्टीमॅक्स मॅन्युफॅक्चरिंग’च्या माध्यमातून त्या यशस्वी उद्योजिका म्हणून समोर आल्या आहेत.

वंदना शेरेकर यांचे शिक्षण एल.एल.बी. पर्यंत झाले आहे. त्या गृहिणी म्हणून घरची जबाबदारी सांभाळत होत्या. मात्र, मनात स्वतःचे काहीतरी वेगळे करण्याची आणि समाजाला प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष रोजगार देण्याची ओढ होती. हीच ओढ त्यांना उद्योजकतेकडे घेऊन गेली. घरच्यांची खंबीर साथ आणि मार्गदर्शनामुळे त्यांनी उद्योगाचे क्षेत्र निवडण्याचे ठरविले.

या स्वप्नाला सत्यात उतरवण्यासाठी त्यांनी ‘मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम’ (CMEGP) या योजनेची माहिती घेतली. या प्रवासात त्यांना जिल्हा उद्योग केंद्र, अमरावती आणि स्टेट बँक ऑफ इंडिया, राजपेठ शाखेचे सहकार्य लाभले. या प्रकल्पासाठी ३४ लाख रुपयांचे कर्ज मंजूर झाले आणि जिल्हा उद्योग केंद्रामार्फत ‘एमसीईडी‘ (MCED) कडून १५ दिवसांचे विशेष तांत्रिक व व्यावसायिक प्रशिक्षणही मिळाले.

जानेवारी २०२६ मध्ये त्यांनी एल्युमिनियम फॉईल कंटेनर आणि पाणी ग्लास तयार करण्याचा उद्योग अधिकृतपणे सुरू केला. व्यवसायाची सुरुवात सोपी नव्हती. सुरुवातीला मशिनरी हाताळणे आणि तयार मालाचे मार्केटिंग करणे यांमध्ये अनेक अडचणी आल्या. परंतु, चिकाटी आणि कष्टाच्या जोरावर त्यांनी या सर्व आव्हानांवर मात केली आणि अल्पावधीतच व्यवसाय सुरळीत सुरू केला.

आज ४९ लाख रुपये प्रकल्प खर्च असलेल्या या उद्योगाची मासिक उलाढाल ४ लाख रुपयांपर्यंत पोहोचली आहे. विशेष म्हणजे, त्यांनी दोन व्यक्तींना आपल्या उद्योगात रोजगारही उपलब्ध करून दिला आहे. गेल्या महिन्यात २५ हजार रुपयांचा नफा मिळवल्यानंतर, आता त्यांनी या महिन्यात ५० हजार रुपयांच्या नफ्याचे उद्दिष्ट ठेवले आहे. भविष्यात आपल्या उद्योगाचा विस्तार करून जास्तीत जास्त लोकांना काम देण्याचा आणि एक यशस्वी उद्योजिका म्हणून समाजात नावलौकिक मिळवण्याचा संकल्प श्रीमती शेरेकर यांनी केला आहे. शासनाच्या योजना आणि कष्टाची तयारी असेल तर एक गृहिणी देखील उद्योग विश्वाचे शिखर गाठू शकते, हेच वंदना यांनी आपल्या उदाहरणातून सिद्ध केले आहे.

 

अपर्णा यावलकर

माहिती अधिकारी,

जिल्हा माहिती कार्यालय,

अमरावती

0000

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *