छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेच्या कंत्राटी कामगारांचे वेतन थेट बँक खात्यात जमा करावे – विधानसभा उपाध्यक्ष अण्णा बनसोडे

मुंबई, दि. ११ : – छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेच्या कंत्राटी कामगारांना स्थानिक स्वराज्य संस्थांच्या नियमानुसार कंत्राटदारांमार्फत निश्चित केलेल्या किमान वेतन दरानुसार थेट बँक खात्यात वेतन जमा केले जावे, असे आदेश विधानसभा उपाध्यक्ष अण्णा बनसोडे यांनी दिले.

विधिमंडळ समिती कक्षात विधानसभा उपाध्यक्ष अण्णा बनसोडे यांचे अध्यक्षतेखाली बैठक झाली. यावेळी छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेचे आयुक्त जी. श्रीधर, पोलीस आयुक्त प्रवीण पवार दूरदृश्यप्रणाली द्वारे बैठकीत सहभागी झाले होते. तसेच सहाय्यक कामगार आयुक्त नितीन पाटणकर, राष्ट्रीय श्रमिक आघाडीचे यशवंत भोसले उपस्थित होते.

छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेच्या विविध कामांसाठी कंत्राटदारांमार्फत नेमलेल्या कंत्राटी कामगारांच्या सेवा घेतल्या आहेत. या सेवेपोटी महानगरपालिकेकडून सदर वेतनाची रक्कम कंत्राटदारास अदा केले जात आहे. कंत्राटदाराकडून कंत्राटी कामगारांच्या बँक खात्यात जमा केलेल्या वेतनाची तपासणी महानगरपालिका अधिकाऱ्यांनी करावी. कंत्राटदाराने २५० कामगारांना कामावरून काढून टाकले असून त्यांना परत कामावर घेण्यासाठी औद्योगिक न्यायालयाने निकाल दिला आहे, यानुसार कंत्राटदाराने त्यांना पुन्हा कामावर घेण्यासाठी कार्यवाही करावी, अशा सूचना विधानसभा उपाध्यक्ष श्री. बनसोडे यांनी केल्या.

महानगरपालिका आयुक्त जी. श्रीधर यांनी कंत्राटी कामगारांच्या वेतनाची रक्कम कंत्राटदारास दिली गेली असून त्याने ती कामगारांना अदा केली नसल्याचे आढळून आल्याने त्याच्यावर कारवाई केली जात आहे. तसेच काढून टाकलेल्या कर्मचाऱ्यांना आवश्यकतेनुसार परत कामावर नेमणुका देण्याबाबत कार्यवाही केली जाईल असे सांगितले.

पिंपरी चिंचवड शहरातील विकास कामांचे सादरीकरण

पिंपरी चिंचवड शहरातील विकास कामांच्या नियोजन आराखड्यांचे सादरीकरण करण्यात आले. मोशी येथे न्यायसंकुल इमारत (खालचा तळ मजला+तळ मजला +५ मजले) (२८ कोर्ट हॉल), नवीन शासकीय विश्रामगृह इमारत, मोशी येथील अन्न व औषध प्रशासनाचे विभागीय कार्यालय व प्रयोगशाळा इमारतीमधील आधारभित, संरक्षक भिंत, काँक्रिटीकरण तसेच प्रशिक्षण केंद्र उभारणी, चिखली येथे पिंपरी चिंचवड पोलिस आयुक्त कार्यालयासाठी नवीन इमारत, रावेत येथे ईव्हीएम व व्हीव्हीपॅट साठवणुकीकरीता गोदाम इमारतीचे बांधकाम या विकास कामांच्या नियोजन आराखड्याची माहिती यावेळी देण्यात आली. यावेळी विभागीय सहनिबंधक योगीराज सुर्वे, कक्ष अधिकारी संदीप पाटील, कामगार उपायुक्त ल. य. भुजबळ यासह पोलीस, कामगार, नगरविकास, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी उपस्थित होते.

विविध खासगी आस्थापनातील कामगारांच्या समस्यांबाबत आढावा

विधानसभा उपाध्यक्ष अण्णा बनसोडे यांनी विधिमंडळ समिती कक्ष येथे आयोजित बैठकीत विविध खासगी आस्थापनातील कामगारांच्या तक्रारींबाबत आढावा घेतला. पिंपरी-चिंचवड येथील लोकमान्य हॉस्पिटल, भांबोली येथील प्लास्टिक ओमनियम प्रा.लि., धानोरी येथील मे.राठी ट्रान्सपॉवर, पॉलीबाँड या खाजगी आस्थापनातील कामगारांच्या तक्रारींबाबत माहिती घेतली. यावेळी न्यायालयात दाखल प्रकरणांबाबत चर्चा झाली. न्यायालयीन निकालाच्या अधीन राहून कार्यवाही करावी अशा सूचना यावेळी देण्यात आल्या. याप्रसंगी सार्वजनिक आरोग्य विभागाचे उपसंचालक डॉ. आर. बी. पवार, अप्पर कामगार आयुक्त बाळासाहेब वाघ, राष्ट्रीय श्रमिक आघाडीचे यशवंत भोसले, कामगार संघटनेचे अर्जुन सुद्रिक यासह अधिकारी व कामगार संघटनांचे प्रतिनिधी उपस्थित होते.

00000

किरण वाघ/विसंअ/

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *