गोदा ते नर्मदा यात्रा : दुष्काळमुक्त महाराष्ट्रासाठी जलसंवर्धनाचा संकल्प – जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील

धुळे, दि. 28 एप्रिल 2026 (जिमाका वृत्तसेवा) : राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली ‘गोदा ते नर्मदा’ पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर जलयात्रा सुरू आहे. या जल यात्रेच्या माध्यमातून दुष्काळमुक्त महाराष्ट्राचा संकल्प साकारण्याचा प्रयत्न केला जात असल्याचे प्रतिपादन राज्याचे जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी केले.

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचे जन्मस्थान श्रीक्षेत्र चोंडी आणि गोदावरीचे उगमस्थान श्रीक्षेत्र त्र्यंबकेश्वर येथून एकाच वेळी जलयात्रेचा शुभारंभ करण्यात आला. आज ही यात्रा धुळे जिल्ह्यात दाखल झाली. धुळे जिल्ह्यात जल्लोषात या यात्रेचे धुळेकरांनी उत्साहात स्वागत केले. यावेळी आमदार अनुपभैया अग्रवाल, आमदार राघवेंद्र पाटील, माजी आमदार कुणाल पाटील आदी उपस्थित होते.

जलसंपदा मंत्री श्री. विखे पाटील म्हणाले की, राज्याचे मुख्यमंत्री मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री सुनेत्राताई अजित पवार यांच्या मार्गदर्शनाखाली गोदा ते नर्मदा जलयात्रा सुरू आहे. या यात्रेच्या माध्यमातून दुष्काळमुक्त महाराष्ट्राचा संकल्प साकार करण्याचा प्रयत्न आहे. या यात्रेसाठी त्र्यंबकेश्वर येथून गोदावरी नदीचे पवित्र जल घेण्यात आले असून, चौंडी येथून पवित्र माती आणण्यात आली आहे. राज्यातील 131 नद्यांचे पाणी एकत्र करून ते नर्मदा नदी मध्ये अर्पण करण्यासाठी नेले जात आहे. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांनी सुमारे 300 वर्षांपूर्वी पाणी संवर्धन व मंदिर पुनर्बांधणीसाठी मोठे कार्य केले होते. त्याच प्रेरणेने राज्य शासन जलसंवर्धनाच्या दिशेने काम करत आहे.

जलसंवर्धनाबाबत जनजागृती, लोकसहभाग आणि शाश्वत पाणी व्यवस्थापनाची संकल्पना अधिक बळकट करणे, हा या जलयात्रेचा मुख्य उद्देश आहे. उद्या बुधवार दि. 29 रोजी यात्रा धुळे येथून धुळे ते महेश्वर (मध्य प्रदेश) असा प्रवास करून या जलयात्रेचा समारोप होणार असल्याचे जलसंपदा मंत्री श्री. विखे पाटील यांनी  सांगितले.

0000

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *