खेळणा मध्यम प्रकल्पाची साठवण क्षमता वाढविण्यासाठी उंची वाढवण्याबरोबरच गाळ काढण्याचा आराखडा तयार करा – मंत्री राधाकृष्ण विखे पाटील

मुंबई, दि. २९ : छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील सिल्लोड तालुक्यातील खेळणा मध्यम प्रकल्पाची साठवण क्षमता वाढविण्यासाठी धरणातील गाळ काढून तो शेतकऱ्यांना उपलब्ध करून द्यावा. धरणाची उंची वाढविण्याच्या प्रस्तावासोबतच हा प्रस्ताव मान्यतेसाठी सादर करावा. त्यामुळे प्रकल्पात अधिक पाणीसाठा निर्माण होईल आणि नवीन धरण उभारण्यासाठी लागणारा मोठा खर्चही वाचू शकतो. या दृष्टीने जलसंपदा विभागाने सविस्तर आराखडा तयार करावा, असे निर्देश जलसंपदा मंत्री (गोदावरी व कृष्णा खोरे विकास महामंडळ) राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिले.

मंत्रालयात मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या अध्यक्षतेखाली छत्रपती संभाजीनगर व जालना जिल्ह्यातील विविध सिंचन प्रकल्पांच्या आढावा बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. बैठकीस आमदार बबनराव लोणीकर, आमदार अब्दुल सत्तार, आमदार हिकमत उडाण, जलसंपदा विभागाचे प्रधान सचिव एकनाथ डवले, सहसचिव नार्वेकर तसेच गोदावरी मराठवाडा पाटबंधारे विकास महामंडळाचे कार्यकारी संचालक जयंत गवळी आणि संबंधित अधिकारी उपस्थित होते. बैठकीत सिल्लोड तालुक्यातील खेळणा मध्यम प्रकल्पाची उंची वाढविण्याच्या प्रस्तावावर चर्चा करण्यात आली. विभागाने यासाठी सुमारे २ कोटी ७४ लाख रुपयांच्या निधीची आवश्यकता दर्शविणारा आराखडा तयार केला असल्याची माहिती यावेळी देण्यात आली.

याशिवाय, अजिंठा बंधाऱ्यामुळे सुमारे ७ दशलक्ष घनमीटर अतिरिक्त पाणी साठवण क्षमता निर्माण होऊ शकते, अशी माहिती बैठकीत देण्यात आली. तापी पाटबंधारे विकास महामंडळाने राज्य जल आराखड्यात या कामासाठी २५० कोटी रुपयांचा खर्च प्रस्तावित केला आहे. तसेच पूर्णा नदीवरील दहा साखळी बंधाऱ्यांच्या कामाचाही आढावा यावेळी घेण्यात आला. जालना जिल्ह्यातील बरबडा-आखणी लघु पाटबंधारे प्रकल्पातील भूसंपादन मोबदला प्रकरण दीर्घकाळ प्रलंबित असल्याबद्दल मंत्री विखे पाटील यांनी नाराजी व्यक्त केली. आखणी गावाच्या पुनर्वसनाबाबत ग्रामसभेने स्वेच्छा पुनर्वसनाचा ठराव मंजूर करून पाठवल्यानंतर संबंधितांना रोख मोबदला देण्याचा प्रस्ताव मुख्यमंत्र्यांच्या मान्यतेसाठी सादर करण्यात येईल, असे त्यांनी स्पष्ट केले.

जालना जिल्ह्यातील परतूर व मंठा तालुक्यातील आंबा, वाघा, टाकळखोपा, तळणी आणि देवठाणे येथील बंधारे काही वर्षांपूर्वी फुटून झालेल्या नुकसानीच्या दुरुस्तीसाठी आवश्यक प्रस्ताव तातडीने सादर करण्याच्या सूचनाही मंत्री विखे पाटील यांनी दिल्या. घनसावंगी तालुक्यातील साष्टे, पिंपळगाव, गुंज आणि गलाठी येथील बंधाऱ्यांमध्ये पाणी उपलब्ध होण्यासाठी आवश्यक उपाययोजना करण्याच्या सूचना देण्यात आल्या. तसेच साठवण प्रकल्पांच्या प्रलंबित कामांचा आढावा घेऊन त्यासाठी आवश्यक निधी उपलब्ध करून देण्याबाबतही बैठकीत चर्चा करण्यात आली.

यावेळी माजी मंत्री आमदार बबनराव लोणीकर आणि आ. अब्दुल सत्तार यांनी संबंधित प्रकल्पांची आवश्यकता अधोरेखित करून त्यावरील कार्यवाही तातडीने करण्याची मागणी केली. आमदार हिकमत उढाण यांनी घनसावंगी तालुक्यातील प्रलंबित सिंचन प्रकल्पांबाबत माहिती दिली.

००००

किरण वाघ/विसंअ

 

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *