खरिपासाठी चोख नियोजन करा; खतांचा तुटवडा भासणार नाही- विभागीय आयुक्त जी. श्रीकांत

छत्रपती संभाजीनगर,दि.१९ : खरीप हंगाम २०२६ च्या पार्श्वभूमीवर विभागीय खरीप पूर्वतयारी बैठक आणि खरीप नियोजनाचा आढावा विभागीय आयुक्त कार्यालयात झाला. या बैठकीत विभागीय कृषी सहसंचालक सुनील वानखेडे यांनी विभागातील छत्रपती संभाजीनगर,जालना ,बीड, लातूर, परभणी हिंगोली, नांदेड व धाराशिव या जिल्ह्यांचा सविस्तर आढावा सादर केला. आणि खत व इतर कृषी निविष्ठांचा काळाबाजार करणाऱ्यांवर कडक कायदेशीर कारवाई करण्याचे निर्देश विभागीय आयुक्त जी .श्रीकांत यांनी दिले.

यावर्षी संभाजीनगर महसूल विभागामध्ये खरीप हंगाम २०२६ साठी एकूण ४९.४४ लाख हेक्टरक्षेत्रावर पेरणीचे नियोजन करण्यात आले आहे. या हंगामासाठी विभागाकडे १७.११ लाख मे.टन खतांची मागणी नोंदवण्यात आली असून, त्यापैकी १४.७३ लाख मे. टन आवंटन मंजूर झाले आहे. तसेच मागील रब्बी हंगामातील शिल्लक साठा ७.१९ लाख मे. टन एवढा आहे. म्हणजेच खरीप हंगामासाठी एकूण २१.९२ लाख मे. टनएवढा खत साठा उपलब्ध होणार आहे. त्यामुळे खरीप हंगामात शेतकऱ्यांना कोणत्याही प्रकारे बियाणे व खतांची कमतरता भासणार नाही, अशी ग्वाही कृषी विभागाने दिली आहे .

विभागीय आयुक्त जी. श्रीकांत यांनी सांगितले की, यावर्षी ‘अल निनो’च्या प्रभावामुळे खते व बियाण्यांची कृत्रिम टंचाई निर्माण होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. ही परिस्थिती लक्षात घेऊन कृषी निविष्ठा उत्पादक, वितरक व विक्रेत्यांनी सामाजिक जबाबदारीचे भान ठेवावे. कोणत्याही प्रकारे कृत्रिम टंचाई, साठेबाजी, लिंकिंग (खतांसोबत इतर उत्पादने खरेदी करण्याची सक्ती) किंवा वाढीव दराने विक्री करण्याचे प्रकार खपवून घेतले जाणार नाहीत. असे गैरप्रकार आढळल्यास संबंधितांवर कायदेशीर व कडक कारवाई केली जाईल, सर्व कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांनी यावर चोख देखरेख ठेवावी, असेही त्यांनी नमूद केले.

अल निनो‘च्या प्रभावामुळे पावसाचा खंड पडणे, कमी पाऊस होणे, पिकांच्या वाढीवर परिणाम होणे आणि पाणीटंचाई निर्माण होणे असे दुष्काळी परिणाम दिसू शकतात. याकरिता शेतकरी बांधवांनी खालील उपाययोजना कराव्यात, असे आवाहन विभागीय आयुक्त आणि कृषी विभागामार्फत करण्यात आले आहे. उपलब्ध पाण्याचा अत्यंत काटकसरीने वापर करावा. ठिबक आणि तुषार सिंचन पद्धतीचा वापर वाढवावा. शेततळ्यांमधील पाणी संरक्षित पाणी म्हणून राखून ठेवावे.

दुष्काळ सहन करू शकणाऱ्या पिकांची (उदा. ज्वारी, बाजरी, तूर, मूग, उडीद, तीळ इ.) निवड करावी आणि पिकांची योग्य वेळेत पेरणी करावी. यासाठी हवामान अंदाजाचा नियमित वापर करावा. जमिनीतील ओलावा टिकवून ठेवण्यासाठी सेंद्रिय खतांचा वापर वाढवावा. आच्छादन (मल्चिंग) पद्धतीचा वापर करावा. समतोल खत व्यवस्थापन आणि एकात्मिक कीड व्यवस्थापन करावे. पिकांचे संभाव्य नुकसान टाळण्यासाठी पीक विमा योजना व कृषि विभागाच्या इतर योजनांचा लाभ घ्यावा.

खरीप हंगामात संभाव्य आव्हानांना तोंड देण्यासाठी कृषी विभाग सज्ज असून, शेतकऱ्यांनीही योग्य नियोजनाचा अवलंब करावा, असे आवाहन विभागीय कृषी सहसंचालक सुनील वानखेडे यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे केले आहे.

00000

 

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *