कोल्हापूर-रत्नागिरी जोडणाऱ्या घाटमार्गांच्या कामांना गती द्या – मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले

मुंबई, दि. २७ :कोल्हापूर आणि रत्नागिरी या दोन जिल्ह्यांना जोडणाऱ्या प्रमुख तीन घाटमार्गांच्या कामांना गती देण्याचे निर्देश सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी मंत्रालयात झालेल्या बैठकीत दिले.

अणुस्कुरा-गावडी (ता. शाहूवाडी, जि. कोल्हापूर) ते लांजा (जि. रत्नागिरी) येथील भांबेड-धनगरवाडी रस्ता, पावनखिंड-गजापूर-विशाळगड पायथा (ता. शाहूवाडी) ते संगमेश्वर तालुक्यातील देवडे-भोवडे जोडणारा नवीन घाटमार्ग, राष्ट्रीय महामार्ग १९३ पासून बाजारभोगाव-किसरूळ-काळजवडे-पोंबरे-कोलीक-पडसाळी ते किजिडी घाटास जोडणारा रस्ता या घाटमार्गासंदर्भात या बैठकीत चर्चा करण्यात आली.

बैठकीस आमदार डॉ. विनायक कोरे, आमदार किरण सामंत, आमदार चंद्रदीप नरके, सचिव (रस्ते) संजय दशपुते, मुख्य अभियंता (राष्ट्रीय महामार्ग) संतोष शेलार, मुख्य अभियंता (कोकण) शरद राजभोज, अधीक्षक अभियंता (कोल्हापूर) तुषार बुरूड, कार्यकारी अभियंता (विशेष प्रकल्प) चंद्रकांत आयरेकर, जिल्हा वन अधिकारी (कोल्हापूर) संजय वाघमोडे यांच्यासह सार्वजनिक बांधकाम विभागाचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

कोल्हापूर-रत्नागिरी दरम्यानचे हे रस्ते देवडे-भोवडे ते विशाळगड घाट, काजिर्डा ते पडसाळी घाट आणि भांबेड ते गावडी घाट अशा तीन प्रमुख घाटांना जोडतात. सह्याद्री पर्वतरांगांतील लांजा व संगमेश्वर तालुक्यातील अनेक मुख्य गावांना हे मार्ग जोडत असल्याने दळणवळण सुलभ होईल, घाटमाथ्यावरील नागरिकांचे जीवनमान उंचावेल तसेच पश्चिम महाराष्ट्र आणि कोकणातील काही जिल्हे थेट जोडले जातील, असे मंत्री भोसले यांनी सांगितले.

वन विभागाच्या आवश्यक सर्व परवानग्या पूर्ण करून रस्त्यांच्या कामांतील अडथळे तातडीने दूर करावेत. आवश्यक ठिकाणी पूल, दिशादर्शक फलक बसवावेत, घाटमार्गांसाठी योग्य सुरक्षात्मक उपाययोजना कराव्यात. तसेच या मार्गांवर एसटी बसेस नियमित धावतील अशा पद्धतीने रस्त्यांची आखणी करण्याचे निर्देशही त्यांनी दिले.

०००

नंदकुमार वाघमारे/विसंअ

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *