कारकिर्दीच्या यशस्वीतेत टीम वर्क महत्वाचे -मुख्य सचिव राजेश कुमार

मुंबई, दि. २८ :- महाराष्ट्र हा माझ्या रक्तात, स्वभावात आणि आचरणात असून कोणत्याही पदावर यशस्वी होण्यासाठी माती आणि संस्कृतीशी एकरुप होणे गरजेचे आहे. आपल्या भारतीय प्रशासकीय सेवेच्या कारकिर्दीत सहकारी अधिकारी आणि कर्मचाऱ्यांसोबतचे टीम वर्क महत्त्वाचे ठरल्याची भावना मुख्य सचिव राजेश कुमार यांनी व्यक्त केली.

मुख्य सचिव राजेश कुमार ३० नोव्हेंबर २०२५ रोजी सेवानिवृत्त होत आहेत. या पार्श्वभूमीवर सामान्य प्रशासन विभागामार्फत त्यांचा सेवापूर्ती समारंभ मंत्रालयात आयोजित करण्यात आला. यावेळी सामान्य प्रशासन विभाग, मंत्रालय अधिकारी कर्मचारी संघटना, महाराष्ट्र राज्य अनुसूचित जाती-जमाती अधिकारी कर्मचारी संघटना, महाराष्ट्र राज्य राजपत्रित अधिकारी महासंघ, आयएएस अधिकारी संघटना यांच्यावतीने त्यांना शुभेच्छा देण्यात आल्या. यावेळी राजेश कुमार यांच्या पत्नी अर्चना राजेश कुमार, अपर मुख्य सचिव राजेश अग्रवाल, अपर मुख्य सचिव ओ.पी.गुप्ता, अपर मुख्य सचिव व्ही.राधा यांच्यासह वरिष्ठ प्रशासकीय अधिकारी, मंत्रालयीन अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.

यावेळी भावना व्यक्त करताना मुख्य सचिव राजेश कुमार म्हणाले, मुख्य सचिव पदावर काम करताना आपण सर्वांना सोबत घेऊन काम करण्याचा प्रयत्न केला. ३७ वर्षांहून अधिक काळ सेवा करताना विविध विभागांमध्ये आणि शहरांमध्ये काम केले. यादरम्यान राज्याच्या कानाकोपऱ्यातील लोकांना भेटण्याचा योग आला असून हीच आपली ताकद आहे. राज्यातील प्रत्येक अधिकाऱ्याकडे क्षमता आणि अनुभव असून त्यांनी महाराष्ट्र सर्व क्षेत्रांमध्ये अग्रस्थानी नेण्यासाठी एकमेकांना सहकार्य करीत काम करावे, असे आवाहन त्यांनी केले.

अपर मुख्य सचिव राजेश अग्रवाल, मिलिंद म्हैसकर, विकास खारगे, वेणुगोपाल रेड्डी, अपर मुख्य सचिव अश्विनी भिडे, प्रशासकीय अधिकारी निपूण विनायक, सहसचिव डॉ.श्रीकांत पुलकुंडवार, अवर सचिव विठ्ठल भास्कर आदींनी यावेळी मनोगतात राजेश कुमार यांच्या कारकीर्दीचा गौरव करुन त्यांना शुभेच्छा दिल्या. सहसचिव विजय चौधरी यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले.

०००००

बी.सी.झंवर/विसंअ

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *