एक सूर निःशब्द झाला ! -उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील 

मुंबई, दि. १२ : ज्येष्ठ गायिका आशा भोसले  यांच्या निधनाने भारतीय संगीतविश्वातील एक अजरामर सूर निःशब्द झाला आहे. संगीत क्षेत्रासाठी ही अत्यंत मोठी हानी आहे,अशा शब्दांत उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील  यांनी आपल्या शोकभावना व्यक्त करून आशा भोसले यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली आहे.

मंत्री चंद्रकांतदादा पाटील  यांनी आपल्या शोकसंदेशात म्हटले आहे की, आशा भोसले  यांनी आपल्या अद्वितीय, मधुर आणि बहुरंगी आवाजाने संगीतप्रेमींच्या हृदयावर अधिराज्य गाजविले. भारतीय संगीताला जागतिक स्तरावर नवे वैभव प्राप्त करून दिले. त्यांचा स्वर, त्यातील सहजता, भावस्पर्शी अभिव्यक्ती आणि विविध रागांवरील प्रभुत्व यामुळे त्या संगीतविश्वातील अजरामर व्यक्तिमत्त्व ठरल्या.त्यांनी गायलेले गीते आजही रसिकांच्या स्मरणात जिवंत आहेत. हिंदी आणि मराठी चित्रपटसृष्टीतील त्यांचे योगदान अतुलनीय असून, त्यांच्या गाण्यातून अनेक नवोदित कलाकारांना प्रेरणा मिळाली आहे.

गानकोकिळा भारतरत्न लताताई मंगेशकर यांच्या नावाने भारतरत्न लता दीनानाथ मंगेशकर आंतरराष्ट्रीय संगीत महाविद्यालय मुंबईत सुरू झाले, त्या प्रक्रियेत आशाताईंची भेट झाली. त्यांच्या आवाजातला गोडवा अनेक रागांवर बेतलेली अनेक भाव-भावना गाण्यांतून सहज व्यक्त करणारा तो आवाज कधीच विसरता येणार नाही!

आशा भोसले  यांचे निधन भारतीय सांगीतिक परंपरेतील एका सुवर्णपर्वाचा अंत आहे. त्यांच्या जाण्याने निर्माण झालेली पोकळी कधीही भरून निघणार नाही. त्यांच्या कुटुंबीयांना, चाहत्यांना आणि संगीतविश्वाला हे दुःख सहन करण्याची शक्ती लाभो, अशी प्रार्थना करून मंत्री चंद्रकांतदादा यांनी त्यांना विनम्र श्रद्धांजली अर्पण केली आहे.

0000

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *