२३ जून ‘एकल महिला दिवस’ म्हणून साजरा करा; स्थानिक स्वराज्य संस्थांना निर्देश

मुंबई, दि. १७ : संयुक्त राष्ट्रसंघाने घोषित केलेला २३ जून हा ‘आंतरराष्ट्रीय विधवा दिन’ राज्यातील सर्व महापालिका, नगरपालिका, नगरपंचायत आणि ग्रामपंचायतींमध्ये ‘एकल महिला दिवस’ म्हणून साजरा करण्यात यावा, यावेळी गावातील किंवा शहरातील सर्व एकल महिलांना सन्मानाने या कार्यक्रमाला निमंत्रित करण्याचे निर्देश महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी दिले आहेत. एकल महिलांच्या सन्मानासाठी ग्रामपंचायतींमध्ये ठराव करण्यात यावा असेही त्या म्हणाल्या.

राज्य शासनामार्फत एकल महिला धोरण तयार करण्याची प्रक्रिया सुरू असून या पार्श्वभूमीवर एकल महिलांच्या समस्या, अपेक्षा आणि त्यांच्यासाठी आवश्यक असलेल्या उपाययोजनांबाबत मंत्रालयात बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी त्या बोलत होत्या.

बैठकीस महिला व बालविकास विभागाचे सचिव डॉ. अनुपकुमार यादव, आयुक्त माधवी सरदेशमुख, आयुक्त डॉ. जगदीश मणियार (दूरदृश्य प्रणालीद्वारे), सहसचिव वी. आर. ठाकूर, अवर सचिव सुनील सरदार, प्रसाद कुलकर्णी, सह आयुक्त वर्षा पवार,उपायुक्त संगीता लोंढे, विजय क्षीरसागर, जामसिंग गिरासे यांच्यासह संबंधित अधिकारी उपस्थित होते.

 

मंत्री आदिती तटकरे म्हणाल्या की, राज्यात ‘विधवा’ या शब्दाऐवजी ‘एकल महिला’ ही सन्मानजनक संज्ञा वापरण्यात यावी; तसेच, गाव अथवा शहरामध्ये एकल महिलांना रूढी-परंपरांच्या आधारावर अपमानास्पद वागणूक दिली जाणार नाही, याबाबत ग्रामसभा अथवा स्थानिक स्वराज्य संस्थांमार्फत ठराव मंजूर करण्यात यावा. तसेच, या कार्यक्रमानिमित्त राज्य शासनाच्या प्रस्तावित एकल महिला धोरणामध्ये कोणत्या बाबींचा समावेश असावा याविषयी महिलांची मते, सूचना आणि अपेक्षा जाणून घेऊन त्या शासनाकडे पाठवण्याचे निर्देशही त्यांनी यावेळी दिले.

मंत्री तटकरे म्हणाल्या की, या कार्यक्रमाद्वारे एकल महिलांच्या सामाजिक, आर्थिक आणि प्रशासकीय अडचणी जाणून घेऊन त्यांचे निराकरण करण्याचा प्रयत्न करण्यासाठी;तसेच शासनाच्या विविध योजनांचा लाभ त्यांच्यापर्यंत प्रभावीपणे पोहोचविण्यासाठी स्थानिक प्रशासनाने पुढाकार घ्यावा.

कार्यक्रमामध्ये महात्मा ज्योतिराव फुले यांच्या २०० व्या जयंती वर्षानिमित्त त्यांच्या प्रतिमेचे पूजन करून महिलांच्या सक्षमीकरणासाठी त्यांनी केलेल्या कार्याची माहिती द्यावी, रोजगार, स्वयंरोजगार आणि उपजीविकेच्या संधींबाबत चर्चा करून, बचत गटात नसलेल्या महिलांना बचत गटांमध्ये समाविष्ट करण्यासाठी विशेष प्रयत्न करावेत. या उपक्रमामुळे शासकीय योजनांची माहिती आणि त्यांचा लाभ अधिक प्रभावीपणे एकल महिलांपर्यंत पोहोचण्यास मदत होणार आहे. तसेच समाजात एकल महिलांना सन्मानपूर्वक व समानतेची वागणूक मिळावी यासाठी जनजागृती होऊन त्यांचे सक्षमीकरण करण्यास हा उपक्रम महत्त्वपूर्ण ठरणार आहे.

०००

श्रद्धा मेश्राम/विसंअ

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *