स्पष्टवक्ता आणि राजकारणापलीकडची मैत्री जपणारा नेता हरपला -पर्यटन मंत्री शंभूराज देसाई

मुंबई, दि. २८:  राज्याचे उपमुख्यमंत्री व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते अजितदादा पवार यांच्या दुःखद निधनाने महाराष्ट्राने एक स्पष्टवक्ता, कणखर निर्णयक्षम आणि राजकारणापलीकडची मैत्री जपणारा प्रभावी नेता गमावला आहे. त्यांच्या विमान अपघाताची बातमी अत्यंत धक्कादायक आहे, अशी शोकसंवेदना पर्यटन मंत्री शंभूराज देसाई यांनी व्यक्त केली.

राजकारण आणि समाजकारण या दोन्ही पातळ्यांवर काम करताना अजितदादांनी कायम परखड भूमिका घेतली. अर्थ खात्याचे नेतृत्व करताना त्यांनी राज्याच्या विकासासाठी महत्त्वपूर्ण निर्णय घेतले. अर्थ खात्याचा राज्यमंत्री म्हणून काम करत असताना तीन वेळा त्यांच्यासोबत राज्याचा अर्थसंकल्प मांडण्याचा अनुभव मिळाला. अर्थसंकल्पाच्या तयारीसाठी विधान परिषदेत नियमितपणे होणाऱ्या बैठकीतून त्यांच्या कामातील बारकावे, अभ्यासू दृष्टिकोन आणि प्रशासनावरची पकड अनुभवता आली, असे पर्यटन मंत्री देसाई यांनी सांगितले.

राज्य उत्पादन शुल्क मंत्री म्हणून कार्यरत असताना तसेच यापूर्वी आमदार म्हणूनही माझे आणि अजितदादांचे राजकारणापलीकडचे स्नेहसंबंध होते. वैचारिक मतभेद असले तरी वैयक्तिक नातेसंबंध जपणारा नेता आणि  प्रशासनातील दादा म्हणून त्यांची ओळख होती. त्यांच्या जाण्याने मंत्रिमंडळातील सहकारी नेतृत्व हरपल्याचे दुःख आहे, अशी भावना पर्यटनमंत्री देसाई यांनी व्यक्त केली. पवार कुटुंबीयांच्या दुःखात आपण सहभागी असल्याचे सांगत, २६१ पाटण विधानसभा मतदारसंघाच्या वतीने तसेच सातारा जिल्ह्याचे पालकमंत्री म्हणून संपूर्ण सातारा जिल्ह्याच्या वतीने अजितदादा पवार यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो, असे पर्यटनमंत्री देसाई यांनी म्हटले.

0000

संध्या गरवारे/विसंअ

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *